मला त्या निर्णयाचा अजिबात धक्का बसला नाही- पंकजा मुंडे

'आता तुमच्यासाठी मी आणि माझ्यासाठी तुम्ही'  

Updated: May 9, 2020, 07:19 AM IST
मला त्या निर्णयाचा अजिबात धक्का बसला नाही- पंकजा मुंडे title=

मुंबई: भाजपने विधानपरिषद निवडणुकीसाठी उमेदवारी नाकारल्यानंतर पंकजा मुंडे यांनी ट्विटरवरून आपल्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला. या ट्विटमध्ये पंकजा यांनी भाजपच्या या निर्णयाचा मला अजिबात धक्का बसला नसल्याचे म्हटले आहे. भाजपकडून विधानपरिषद निवडणुकीसाठी उमेदवार जाहीर झाल्यानंतर अनेकजण फोन करुन दु:ख व्यक्त करतायत. पण वाघांनो असं रडताय काय मी आहे ना ,'तुमच्यासाठी मी आणि माझ्यासाठी तुम्ही' बस साहेबांचे आशिर्वाद आहेत दिवसभर फोन उचलले नाही कुणाकुणाला उत्तर देऊ ?या निर्णयाचा मला धक्का अजिबात बसला नाही. भाजप च्या त्या चार ही उमेदवारांना आशिर्वाद, असे पंकजा यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

कोण आहेत भाजपचे विधानपरिषदेचे उमेदवार?

विधानसभा निवडणुकीवेळी भाजप नेतृत्त्वाने चंद्रशेखर बावनकुळे, एकनाथ खडसे आणि विनोद तावडे यांना उमेदवारी नाकारली होती. तर पंकजा मुंडे यांचा परळी मतदारसंघात पराभव झाला होता. त्यामुळे हे सर्व नेते पुनर्वसनाच्या प्रतिक्षेत होते. एकनाथ खडसे यांनी अलीकडे राज्याच्या राजकारणात सक्रिय होण्याची इच्छाही बोलून दाखवली होती. तर काही महिन्यांपूर्वी पंकजा मुंडे आणि एकनाथ खडसे यांनी गोपीनाथ गडावर जोरदार शक्तीप्रदर्शनही केले होते. त्यामुळे भाजपकडून या नेत्यांना विधानपरिषदेवर पाठवले जाईल, असा अंदाज होता. मात्र, भाजप नेतृत्त्वाने सगळ्यांनाच धक्का देत या प्रस्थापित नेत्यांना बाकावरच बसवून ठेवले  आहे.

विधानपरिषदेची उमेदवारी नाकारल्याने खडसे भडकले

त्यामुळे आता पक्षातील नाराजी पुन्हा उफाळून येण्याची शक्यता आहे. एकनाथ खडसे आणि राम शिंदे या बड्या नेत्यांनी कालच आपली नाराजी जाहीरपणे बोलून दाखवली होती. मला उमेदवारी द्यायची नव्हती तर किमान काही वर्षे पक्षाचे काम करणाऱ्यांना संधी द्यायला हवी होती. तसे झाले असते तर मला आनंद वाटला असता. पण पक्षाला शिव्या देणाऱ्यांना इथं संधी दिली गेली आहे. भाजप कुठल्या दिशेने चाललाय, असा सवाल खडसे यांनी उपस्थित केला होता.