मुंबई : गेल्या काही दिवसांपासून देशभरात Coronavirus कोरोना व्हायरसचं थैमान सातत्यानं सुरु असतानाच महाराष्ट्रातही याबाबतचं चित्र वेगळं नाही. कोरोना रुग्णांचा आकडा राज्यात अतिशय झपाट्यानं वाढत असतानाच आता राज्य शासन यात अपयशी ठरल्याचा आरोप विरोधी पक्षाकडून करण्यात येत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी पुन्हा एकदा महाविकास आघाडी सरकारच्या कार्यपद्धतीवर टीका करत नाराजीचा सूर आळवला. काही दिवसांपूर्वीच लॉकडाऊन बऱ्याच काळासाठी लागू केल्यानंतर देशासह राज्यात अनलॉकची सुरुवात करण्यात आली. खुद्द मुख्यमंत्र्यांनीच पुनःश्च हरिओमची ग्वाही देत एक नवी सुरुवात करण्याचा विश्वास व्यक्त केला होता. त्या अनुशंगानं पावलंही उचलली गेली. पण, आता मात्र लॉकडाऊनमध्ये केंद्राकडून शिथिलता दिली जात असताना राज्यात मात्र काही निर्बंध उठवण्यातच आलेले नाहीत. 


राज्य शासनाच्या याच भूमिकेवर दरेकर यांनी टीका करत सरकार भांबावल्याचं वक्तव्य केलं. 'हे सरकार भांबावलेलं आहे. स्वत: पुनःश्च हरिओम म्हणतात आणि पुन्हा लॉकडाऊन लावतात. व्यापाऱ्यांनी मागणी केली म्हणून लॉकडाऊन उठवलं असंही म्हणतात', असं चित्रं शब्दांत मांडत त्यांनी उद्योग व्यवस्था नीट चालली नाही तर अराजकता पसरेल या म्हणण्यावर जोर दिला. 


 


विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाबाबत बोलतवेळी त्यांनी विरोधी पक्षाची सत्ताधाऱ्यांच्या बाबतीत एकंदर काय भूमिका असेल याचे संकेतही दिले. राज्यात कोरोना आटोक्यात येत नाही, कोरोनावर नियंत्रण आणण्यात शासन पूर्ण अपयशी ठरले आहे, कुठलीही गोष्ट झाली की केंद्रावर ढकलायची आणि जबाबदारी झटकायची यावर आम्ही बोलणार. राज्य सरकारने नेमकं काय केलं आहे याचा 'पर्दाफाश' करणार असा इशारा त्यांनी दिला.