मुंबई : राष्ट्रवादीचे साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याची माहिती पुढे आली. त्याचवेळी त्यांनी मंत्री पंकजा मुंडे यांचीही भेट घेतली. मात्र, ही भेट विकासकामांसाठी असल्याचे स्पष्टीकरण उदयनराजे भोसले यांनी दिलेय. दरम्यान, राष्ट्रवादीकडून त्यांना उमेदवारी मिळणार नसल्याने त्यांनी भाजप नेत्यांची भेट घेतल्याचे बोलले जात आहे. तर खासदार भोसले हे भाजपमध्ये प्रवेश करतील, अशा चर्चांना उधाण आले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मतदारसंघातील कामांबाबत उदयनराजे भोसले यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली असल्याचं सांगितलं जात असलं तरी या भेटीमागे राजकीय गणितं असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. उदयनराजेंनी केवळ मुख्यमंत्र्यांचीच नव्हे तर महसूलमंत्री चंद्रकांत पाटील आणि अन्न व नागरी पुरवठामंत्री गिरीश बापटांचीही भेट घेतली. चंद्रकांत पाटलांच्या भेटीसाठी मात्र त्यांना अर्धा तास प्रतीक्षा करावी लागली. त्यानंतर ते पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांची भेट घेण्यासाठी गेले. 


सातारा लोकसभा मतदारसंघातून उदयनराजे यांना उमेदवारी देण्याबाबत राष्टावादीतून विरोध होतोय. त्यापार्श्वभूमीवर भाजपाचे सातारा जिल्ह्यातील नेते डॉ. दिलीप येळगावकर यांनी उदयनराजे यांना भाजपात येण्याचं निमंत्रण दिले आहे. त्यामुळे उदयनराजेंनी साताऱ्याच्या विकासकामांसाठी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली की भेटीत दुसरीच खलबतं करण्यात आली याबाबत आता चर्चांना उधाण आलंय. राष्ट्रवादीच्या 7 ऑक्टोबरला मुंबईत झालेल्या बैठकीनंतर सर्वच पक्षांमध्ये आपले मित्र आहेत, असे उदयनराजेंनी म्हटलं होते.