मुंबई: भाजपचे नाराज नेते एकनाथ खडसे हे पंकजा मुंडे यांची भेट घेण्यासाठी त्यांच्या घरी पोहोचले आहेत. काहीवेळापूर्वीच विनोद तावडे यांनी खडसेंच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्याशी चर्चा केली होती. ही चर्चा संपल्यानंतर एकनाथ खडसे पंकजा यांच्या रॉयलस्टोन बंगल्यावर दाखल झाले आहेत. सध्या या दोघांमध्ये गुप्त खलबते सुरु आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महाविकास आघाडीच्या प्रयोगामुळे महाराष्ट्रातील राजकीय समीकरणे बदलल्यानंतर आता भाजपमधील अंतर्गत वाट चव्हाट्यावर येऊ लागले आहेत. भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे आणि पंकजा मुंडे यांनी गेल्या काही दिवसांमध्ये आपली नाराजी जाहीरपणे व्यक्त केली होती. त्यामुळे हे दोन्ही नेते नजीकच्या काळात भाजपला धक्का देतील, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. 


पंकजा मुंडेंना न्याय मिळणार; नाना पटोलेंचे सूचक वक्तव्य


भाजप नेत्या पंकजा मुंडे येत्या १२ तारखेला गोपीनाथ गडावरून आपल्या आगामी राजकारणाची दिशा स्पष्ट करणार आहेत. पंकजा मुंडे शिवसेनेत प्रवेश करू शकतात किंवा स्वत:चा पक्ष स्थापन करतील, या चर्चेने राजकीय वर्तुळात जोर धरला आहे.


'चैत्यभूमीवर जायला मुख्यमंत्र्यांकडे वेळ नाही'


तर दुसरीकडे एकनाथ खडसे यांनीही भाजप नेतृत्तावर जाहीरपणे तोफ डागली होती. भाजपने अंतर्गत राजकारणातून रोहिणी खडसे आणि पंकजा मुंडे यांना पाडले. निवडणुकीत पक्षांतर्गत कुरघोड्या तर झाल्याच, पण त्यांना पाडण्याचे उद्योग झाले, असा आरोप खडसे यांनी केला होता.


गेल्या पाच वर्षांपासून भाजपमध्ये देवेंद्र फडणवीस यांचा दबदबा होता. फडणवीस यांच्यावर अनेक नेते नाराज असले तरी ही नाराजी चव्हाट्यावर आली नव्हती. मात्र, आता सत्तेवरून पायउतार झाल्यानंतर अनेकांनी आपली नाराजी जाहीरपणे बोलून दाखवण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे भाजपला या बंडखोरीची दखल घ्यावी लागत आहे. आगामी काळात महाविकास आघाडीमुळे स्थानिक स्वराज्य संस्थातील समीकरणे बिघडू शकतात. अशावेळी पक्षातील नाराजांना काबूत ठेवणे, भाजपसाठी गरजेचे आहे.