मुंबई : मुख्यमत्र्यांचं निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर आवराआवरीला सुरुवात झाली आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या बंगल्यात गेली 5 वर्ष राहत होते. पण आता उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री होणार असल्याने त्यांना हा बंगला खाली करावा लागणार आहे. सोबतच अनेक भाजप नेते आणि माजी मंत्री यांनी देखील सरकारी बंगले खाली करण्यास सुरुवात केली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज्यात सत्तास्थापन करण्यात अपयशी ठरल्यानंतर आता देवेंद्र फडणवीस यांच्यासह सगळ्या माजी मंत्र्यांना सरकारी बंगले खाली करावे लागणार आहेत. मंत्रालया समोर असलेले सरकारी बंगले खाली करण्यास सुरुवात झाली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर मंत्रिमंडळ बरखास्त झालं होतं. पण पुन्हा एकदा अजित पवार यांच्यासोबत फडणवीसांनी सरकार स्थापन केलं होतं. पण बहुमत नसल्याने 3 दिवसातच त्यांना राजीनामा द्यावा लागला होता.


राष्ट्रपती शासन लागू झाल्यानंतरच सगळ्या मंत्र्यांना बंगले खाली करण्यासाठी पत्र पाठवण्यात आलं होतं. पण त्यानंतर ही सत्तेचा संघर्ष सुरु होता. पण आता शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस महाआघाडीचं सरकार स्थापन होणार असल्याने भाजपच्या सर्व मंत्र्यांना हे बंगले खाली करावे लागणार आहे.