मुंबई : देशाच्या आर्थिक राजधानीमध्ये म्हणजेच मुंबईत असणारं आयएफएससी IFSC केंद्र गुजरातला हलवण्याच्या मुद्द्यावर राजकीय वर्तुळात आता आरोप प्रत्यारोपांची सत्र सुरु झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. महाविकास आघाडीमध्ये सध्या सुरु असणारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आमदारकीचा मुद्दा राज्याच्या राजकारणात चर्चेत असतानाच आता, संपूर्ण देशाचं लक्ष वेधणारा IFSC चा मुद्दाही वादाचा विषय ठरु लागला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

IFSC हवं असेल तर, श्वेतपत्रिका काढा, असा सूर भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी आळवत त्यावेळी भाजपसोबत सत्तेत असणाऱ्या शिवसेनेच्या भूमिकेवर प्रश्नचिन्हं उपस्थित केलं आहे. आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र मुंबईतून गुजरातला का हलवण्यात आलं, याची कारणं शोधण्याचा सल्ला देत गेल्या दोन वर्षांमध्ये राज्य सरकारने केलेला पत्रव्यवहार सर्वांसमोर आणा असं आव्हान मुनगंटीवार यांनी दिलं. 


राजकारण न करता जनतेसमोर ठाम भूमिका मांडा असं म्हणत आमदारकीसाठी राज्यपालांच्या भेटीची सत्र होतात, मोदींना दूरध्वनीवरुन संपर्कही केला जातो मग, आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्राच्या मुद्द्यावरुन कोणताही फोन अद्यापही गेलेला का नाही, असा प्रश्न मांडत त्यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे. मुख्यम्हणजे खुद्द सुभाष देसाई उद्योगमंत्री पदावर होते. पण, भाजप एकटं सत्तेत नव्हतं. त्यामुळे शिवसेनेने आपली भूमिकाही आता स्पष्ट करणं तितकंच महत्त्वाचं असल्याचा मुद्दा त्यांनी उलचून धरला. 


 


दरम्यान, या प्रसंगी  महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडूनही शिवसेनेवर टीकेची झोड उठवण्यात येत आहे. मनसेच्या किर्तीकुमार शिंदे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून, याविषयी काही प्रश्न उपस्थित करत शिवसेनेवर टीका केली. ''आदरणीय सुभाष देसाई साहेब, प्रस्तावित #IFSC मुख्यालय मुंबईहून गुजरात-गांधीनगरमध्ये नेण्याची प्रक्रिया एका रात्रीत घडलेली नाही'', असं म्हणत नरेंद्र मोदी जेव्हा पंतप्रधानपदी आले त्याचवेळी "मुंबईत #IFSC"चं महाराष्ट्राचं स्वप्न भंगल, हा मुद्दा त्यांनी अधोरेखित केला.