सागर कुलकर्णी, झी मीडिया, मुंबई :  मुंबईतील मराठी शाळांचा (Marathi  Medium School) मुद्दावरु भाजपाने (BJP) शिवसेनावर (Shiv Sena) टीका केली आहे. भाजपा आमदार अमित साटम (Ameet Satam) यांनी मुंबईतच मराठी शाळांची गळचेपी होत असल्याचा आरोप करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Udhav Thackeray) यांना पत्र पाठवलं आहे. या पत्रात मुंबई मनपा क्षेत्रात मराठी शाळेत सेवासुविधांचा अभाव आहे, मुख्याध्यापक शिक्षक मिळत नाहीत, यामुळे मराठी शाळांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप केला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

2013 नंतर मराठी शाळेत शिक्षक भरती झालेली नाही, सुविधा नाहीत, मराठी माणसाच्या मु्ददावर राजकरण करता तर मराठी शाळाही सुधारावी असा टोला आमदार अमित साटम यांनी लगावला आहे. गेल्या तीस वर्षात मुंबईतील मराठी माणूसच मुंबईच्या बाहेर फेकला गेला. त्याचप्रमाणे गेल्या दहावर्षात मराठी शाळांची संख्या आणि मराठी विद्यार्थ्यांची पटसंख्या निम्म्याहून कमी झाली आहे, असं आमदार अमित साटम यांनी म्हटलं आहे.


पत्रात नेमके काय म्हटलंय आहे


मुख्यमंत्री महोदय, आपणास ज्ञात असेल की संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत 107 हुतात्म्यांनंतर 1 मे 1960 रोजी मराठी भाषिकांसाठी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. मुंबईत असलेले हुतात्मा स्मारक आपणास ‘मराठी माणसाने‘ मराठी बाण्यासाठी दिलेल्या बलीदानाची सदैव आठवण करून देत असेलच!


सत्ताधारी सेनेने मराठी आस्मितेचा आधार घेत गेली तीस वर्षे मुंबई महानगर पालिकेत सत्ता आपल्या ताब्यात ठेवली, पण गेल्या तीस वर्षात मुंबईतील मराठी माणूसच मुंबईच्या बाहेर फेकला गेला. हे वास्तव कुणीही नाकारू शकत नाही. अगदी त्याचप्रमाणे गेल्या दहावर्षात मराठी शाळांची संख्या आणि मराठी विद्यार्थ्यांची पटसंख्या निम्म्याहून कमी झाली आहे, याला योगायोगच म्हणावा की मराठीचं नशिब?


सन 2010 - 2011 मध्ये मराठी शाळांची संख्या 413 होती आणि विद्यार्थी संख्या 1,02,214 होती. आता सन 2020 - 2021 मध्ये शाळांची संख्या फक्त 280 राहिली आहे तर विद्यार्थ्यांची संख्या फक्त 36,114. मराठी शाळांना सहा-सहा महिने मुख्यध्यापक मिळत नाही. इतकच नाहीतर 2013 नंतर आवश्यकतेनुसार शिक्षक भरतीही झाली नाही.


आपणास पत्र लिहण्याचे कारण की मला मिळालेल्या माहितीनुसार मराठी भाषेची अशीच अधोगती सुरू राहिली तर 2027 - 2028 सालापर्यंत मराठी माणसाला आपल्या हक्काच्या मुंबईत आपल्या मुलांसाठी एकही मराठी शाळा उपलब्ध राहणार नाही.


ज्या मायमराठीने गेली 30 वर्ष मुंबई महानगर पालिकेत एकहाती सत्ता शिवसेनेला दिली, त्याच मराठीचे हाल बघून मला कविवर्य कुसुमाग्रज यांचे वाक्य आठवते. “मराठी भाषा मंत्रालयासमोर भीक मागत उभी आहे”.