मुंबई: भाजपचे मुंबई प्रदेशाध्यक्ष आणि बांधकाम व्यावसायिक मंगलप्रभात लोढा यांनी देशातील सर्वात श्रीमंत बिल्डरचा बहुमान पटकावला आहे. हुरुन रिपोर्ट आणि ग्रोही इंडियातर्फे 'ग्रोही हुरुन इंडिया रीयल एस्टेट रिच लिस्ट २०१९' जारी करण्यात आली. या यादीत मंगलप्रभात लोढा यांनी अग्रस्थान मिळवले. लोढा व त्यांच्या परिवाराची एकूण संपत्ती ३१,९६० कोटी रुपयांवर पोहोचली असून चालू वर्षात त्यात १८ टक्क्यांनी वाढ झाली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तर डीएलएफचे राजीव सिंग व एम्बॅसी समूहाचे संस्थापक जितेंद्र विरवाणी हे यादीत अनुक्रमे दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकावर आहेत. यापैकी राजीव सिंग यांची संपत्ती २५,०८० कोटी इतकी आहे. तर जितेंद्र विरवाणी यांच्याकडे २४ हजार ७५० कोटींची संपत्ती आहे. १०० जणांच्या या सूचीतील सर्व बांधकाम व्यावसायिकांच्या एकूण मालमत्तेच्या तुलनेत लोढा यांची मालमत्ता १२ टक्के आहे. 


'ग्रोहे हुरुन' च्या सर्वेक्षणानुसार देशभरातील सहा अव्वल बिल्डर हे मुंबईत राहणारे आहेत.  या यादीतील १०० पैकी ३७ बिल्डर मुंबईत राहत आहेत. दिल्ली आणि बंगळूरमध्ये यादीतील प्रत्येकी १९ बांधकाम व्यावसायिक राहतात. 


गेल्या काही दिवसांपासून बांधकाम क्षेत्रात मंदीचे वातावरण आहे. केंद्र सरकारने मध्यंतरी बांधकाम क्षेत्राला चालना देण्यासाठी काही उपाययोजनाही जाहीर केल्या होत्या. मात्र, त्याचा अपेक्षित परिणामी दिसून आला नव्हता. तरीही बांधकाम व्यावसायिकांची कोटीच्या कोटी उड्डाणे पाहून अनेकांन आश्चर्याचा धक्का बसला आहे. 


देशातील टॉप १० बिल्डर


१. मंगलप्रभात लोढा- लोढा डेव्हलपर्स
२. राजीव सिंग- डीएलएफ
३. जितेंद्र विरवाणी- एम्बॅसी समूह
४. डॉ. निरंजन हिरानंदानी- हिरानंदानी समूह
५. चंदू रहेजा- के.रहेजा
६. विकास ओबेरॉय- ओबेरॉय रियल्टी
७. राजा बागमाने- बागमाने डेव्हलपर्स
८. सुरेंद्र हिरानंदानी- हाऊस ऑफ हिरानंदानी, सिंगापूर
९. सुभाष रुणवाल- रुणवाल डेव्हलपर्स
१०. अजय पिरामल- पिरामल रियल्टीज