पालकमंत्री उदय सामंत कोकणातील शक्ती कपूर, नितेश राणे यांची खोचक टीका
रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये चालवलेल्या गैरकारभार आणि शासकीय गैरवापराची चौकशीची करण्याची मागणी
मुंबई : भाजपाच्या जनसंपर्क यात्रेनंतर राज्यात नारायण राणे आणि शिवसेना यांच्यात संघर्ष वाढताना पाहिला मिळतोय. त्यातच आता नव्या वादाला सुरुवात झाली आहे. भाजप आमदार नितेश राणे यांनी शिवसेना नेते आणि सिंधुदुर्गचे पालकमंत्री उदय सामंत यांच्यावर खोचक टीका केली आहे. उदय सामंत हे कोकणातील शक्ती कपूर आहेत, असं नितेश राणे यांनी म्हटलं आहे.
उदय सामंत कोकणातील शक्ती कपूर
नितेश राणे यांनी एक व्हिडिओ ट्विट केला असून त्यात त्यांनी उदय सामंत यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. या व्हिडिओत नितेश राणे यांनी म्हटलं आहे 'आमच्या कोकणाचे शक्ती कपूर आणि कोकणातील सचिन वाझे यांचे भाऊ सिंधुदुर्गचे पालकमंत्री उदय सामंत यांनी दोन मोठ्या घोषणा केल्या. त्यातील एक म्हणजे कोकणात येणारं वैदयकीय महाविद्यालय, या महाविद्यालयाबद्दल आम्हाला सगळ्यांनाच आनंद आहे. पण या महाविद्यालला परवानगी नारायण राणे केंद्रीय मंत्री झाल्यानंतर मिळाली, तसंच चीपी विमानतळासाठी विमानसेवा सुरु करण्याची परवानगीही नारायण राणे यांच्यामुळेच मिळाली असा दावा नितेश राणे यांनी केला आहे.
उदय सामंत कदाचित विसरले असतील महाविद्यालय आणि चिपी विमानतळासाठीच्या परवानग्या, मिळवण्यासाठी केंद्र सरकारमध्ये ताकद लागते, वलय लागतं, राणेसाहेब केंद्रीय मंत्री झाल्यानंतर चिपी विमानतळाला परवानगी कशी मिळाली, 2014 ते 2019 मध्ये शिवसेना पक्षाचे अरविंद सावंत हे कोकणाचे भूमिपूत्र आहेत, ते ही केंद्रात मंत्री होते, तेव्हा का परवानगी मिळाली नाही. तेव्हा तर शिवसेना भाजपमध्ये युतीत होतात, पण नारायण राणे केंद्रीय मंत्री झाल्यावर परवानग्या कशा मिळतात असा सवाल करत घाणेरडं राजकारण करण्यापेक्षा हे प्रकल्प मार्गी कसे लागतील याचा विचार करावा, असा टोला नितेश राणे यांनी लगावला आहे.
किरिट सोमय्यांना लिहिलं पत्र
इतकंच नाही तर नितेश राणे यांनी भाजप नेते किरिट सोमय्या यांना पत्र लिहित उदय सामंत आणि त्यांचे बंधू किरण सामंत यांनी रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये भ्रष्ट मार्गाचा अवलंब करुन चालवलेला गैरकारभार आणि शासकीय गैरवापर याच्या चौकशीची मागणी करावी असं नितेश राणे यांनी पत्रात म्हटलं आहे.
उदय सामंत आणि किरण सामंत यांनी सर्व प्रशासकीय यंत्रणा हाताशी धरून गैरमार्गाने पैसा जमा करुन त्याचा वापर राजकारणासाठी करण्याचा प्रयत्न सुरु केल्याने जनतेमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. या भ्रष्टकारभाराची चौकशी होऊ कारवाई होणं गरजेचं आहे, याबाब सर्व पुरावे लवकरच सादर करण्यात येतील असं नितेश राणे यांनी सोमय्या यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे.