`अर्णब गोस्वामींना भेटण्यासाठी तळोजा कारागृहाकडे निघालोय, हिंमत असेल तर रोखून दाखवा`
राज्यसरकार आणि विरोधी पक्षनेते आमनेसामने
मुंबई : रिपब्लिक वाहिनीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना झालेल्या अटकेनंतर सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष आमने-सामने आलेले आहेत. गोस्वामींना झालेल्या अटकेवरून भाजप सतत शिवसेनेवर टीका करत आहे. असं असताना भाजप आमदार राम कदम यांनी सरकारला आव्हान दिलं आहे.
राम कदम यांनी पोलीस आणि राज्य सरकारला आव्हान केलं आहे की,'मी अर्णब गोस्वामींना भेटण्यासाठी तळोजा कारागृहात जात आहे. हिंमत असेल तर रोखून दाखवा.' अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात अर्णब गोस्वामींना झालेल्या अटकेविरोधात एक दिवसाचे उपोषण आणि सिद्धिविनायक मंदिरापर्यंत चालत आंदोलन केल्यानंतर राम कदम यांनी आज थेट अर्णब गोस्वामींची भेट घेण्यासाठी तळोजा कारागृहाच्या दिशेने कूच केली आहे.
काय आहे हे प्रकरण?
अन्वय नाईक यांनी रिपब्लिकन tv चॅनलच्या स्टुडीओच्या इंटेरियर डिझाईनचे काम केले होते. यासाठी 5 कोटी 40 लाख एवढे बिल अर्णव गोस्वामी यांच्याकडून घेणे होते. परंतु वारंवार बिल मागूनही अर्णव गोस्वामी यांच्याकडून बिल दिले जात नव्हते. त्यामुळे मानसिक तणावाखाली अन्वय नाईक यांनी आत्महत्या केली होती. आत्महत्येपूर्वी नाईक यांनी लिहिलेल्या चिठ्ठीत आपल्या आत्महत्येस अर्णब याला जबाबदार धरलं होतं. तसेच त्यांच्या आईने देखील आत्महत्या केली आहे. या घटनेसंदर्भात अन्वय नाईक यांच्या पत्नीने तक्रार दिल्यानंतर ही कारवाई करण्यात आली असून रायगड पोलिसांकडून कलम 306 अन्वये कारवाई करण्यात आली आहे.