विश्वासदर्शक ठरावाआधीच भाजप आमदारांचा सभात्याग
विश्वासदर्शक ठरावादरम्यान भाजपच्या सर्व आमादारांनी सभात्याग केला आहे.
मुंबई | विश्वासदर्शक ठरावादरम्यान माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपच्या सर्व आमादारांनी सभात्याग दिला आहे. उद्धव ठाकरे सरकारच्या विश्वासदर्शक ठरावादरम्यान भाजपच्या सर्व आमदारांनी वॉक आऊट केलं. सभागृहाच्या बाहेर भाजप आमदारांनी घोषणाबाजी केली.
आज अधिवेशनाला सुरुवात होताच देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार हल्लाबोल चढवला..हे अधिवेशन नियमाला धरून नसल्याचं सांगत कोणत्याही नवीन अधिवेशनाची सुरुवात ही वंदे मातरमने होते...मग या अधिवेशनाची सुरुवात वंदे मातरमने का झाली नाही असा सवाल फडणवीसांनी उपस्थित केला. तसंच रात्री १ वाजता अधिवेशनाचं निमंत्रण मिळतं याबाबतही आक्षेप नोंदवला. अधिवेशन हे नियमाला धरून नसल्याचं सांगत अधिवेशन बोलवण्यासाठी राज्यपालांनी समन्स बोलवणं गरजेचं असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
मंत्र्यांनी शपथ घेताना बाळासाहेब ठाकरे, शरद पवार आणि सोनिया गांधींची नावं घेतली. शपथ घेतानाचा फॉर्मेट ठरलेला असतानाही अशा पद्धतीने शपथ घेण्यात आली. जगभरामध्येही शपथविधीचे नियम ठरलेले आहेत. चुकीच्या पद्धतीने शपथ घेतल्यामुळे बराक ओबामांना अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी पुन्हा शपथ घ्यावी लागली, अशी आठवण फडणवीस यांनी करून दिली.
अध्यक्षपदाच्या निवडणुकीवरूनही फडणवीसांनी महाविकासआघाडीवर टीका केली. अध्यक्षपदाच्या निवडणुकीआधी कधीच विश्वासदर्शक ठराव मांडलेला नाही. गुप्त मतदान घेतलं असतं तुम्हाला पराभव होईल, अशी भीती होती. विधिमंडळाचं कामकाज बेकायदेशीर आणि असंवैधानिक आहे, असा आरोप फडणवीस यांनी केला. फडणवीस बोलत असताना भाजपचे आमदार वेलमध्ये आले.
देवेंद्र फडणवीस यांच्या या आरोपांना हंगामी अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील यांनी उत्तर दिलं. शपथविधीचा या सभागृहाशी संबंध नाही, त्यावर मी भाष्य करु शकत नाही. हंगामी अध्यक्षाच्या नावाची शिफारस करण्याचे अधिकार सरकारचा आहे. ही शिफारस राज्यपालांनी मान्य केली आहे. अध्यक्षांच्या या प्रतिक्रियेनंतर भाजपच्या आमदारांनी बहिष्कार घातला. भाजप आमदार बाहेर जात असताना सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनी मी पुन्हा येईन, अशी घोषणाबाजी केली.
देवेंद्र फडणवीस यांच्या टीकेला महाविकासआघाडीच्या नेत्यांनीही प्रत्युत्तर दिलं. छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव शपथविधीवेळी घेतलं त्याचा देवेंद्र फडणवीस यांना राग का आला? असा सवाल जयंत पाटील यांनी विचारला.
देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या टीकेवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही निशाणा साधला. भाषणामध्ये शाहू-फुले-आंबेडकरांची नावं घेता, मग शपथविधीवेळी त्यांचं नाव घेतलं तर इंगळ्या डसाव्या. मी छत्रपती शिवरायांची, माझ्या आई-वडिलांची शपथ पुन्हा घेईन. हा जर गुन्हा असेल तर तो मी प्रत्येक जन्मात करेन, असं उद्धव ठाकरे म्हणाले.