Maharashtra Politics : राज्यातील सत्तातरानंतर शिंदे - फडणवीस सरकार (shinde fadnavis government) सत्तेवर आले आहे. 40 आमदारांना घेऊन शिवसेनेतून बाहेर पडत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी भाजपसोबत (BJP) मिळून राज्यात सत्ता स्थापन केली आहे. मात्र सरकारमध्येच वारंवार खदखद असल्याचे दिसून येत आहे. शिंदे गटातील आमदारांमध्ये वाद सुरु असतानाच आता थेट मुख्यमंत्र्यांवरच टीका करण्यात येत आहे. उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातील भाजप खासदार गोपाळ शेट्टी (BJP MP Gopal Shetty) यांनी शिंदे - फडणवीस सरकारला घरचा आहेर देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरच निशाणा साधला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मात्र यावेळी वादाचे कारण ठरले आहे मुख्यमंत्र्यांच्या पत्नीच्या मैत्रिणीच्या मुलीने कबड्डीत सुवर्णपदक पटकावल्यानंतर मिळालेले बक्षिस. मिसेस मुख्यमंत्री यांच्या मैत्रिणीच्या मुलीने कबड्डीत सुवर्णपदक मिळवल्यानंतर तिला एक कोटी रुपयांचे बक्षीस देण्यात आल्याचे वृत्त समोर आले आहे. यावरुनच भाजप खासदार गोपाळ शेट्टी यांनी सरकारवर टीका केली आहे. एखाद्या कबड्डीपटूची ओळख मुख्यमंत्र्यांच्या पत्नीशी नाही तर त्याला काहीही देऊ नये, ही कोणती व्यवस्था आहे? असा सवाल गोपाळ शेट्टी यांनी केला आहे. त्यामुळे आता भाजप विरुद्ध शिंदे गट असा वाद रंगण्याची शक्यता निर्माण झाली आहे.


काय म्हणाले गोपाळ शेट्टी?


"मुख्यमंत्र्याच्या पत्नीच्या एका मैत्रिणीच्या मुलीने कबड्डीमध्ये सुवर्णपदक पटकावले. त्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी तिला एक कोटी रुपयांचे बक्षिस दिले. तीन जणांनी शिवछत्रपती पुरस्कार पटकावला होता. त्यांनी घराची मागणी केली होती. विधानसभेत असल्यापासून मी त्यासाठी सरकारकडे पाठपुरावा करत आहे. सरकारने अद्याप त्यांना घर दिलेले नाही. मात्र कबड्डी स्पर्धेत सुवर्णपदक मिळवणाऱ्यांना एक कोटीचे बक्षिस हे सरकार देते. ही कोणती पद्धत आहे?" असा सवाल गोपाळ शेट्टी यांनी केला.


पुरस्कारप्राप्त खेळाडूंना 500 फुटांची घरे द्या


"क्रीडापटूंना त्यांच्या कामगिरीनुसार बक्षिस दिले पाहिजे यात वाद नाही. पण त्यासाठी निश्चित धोरण बनवायला हवे. शिवछत्रपती पुरस्कार हा क्रीडा क्षेत्रातील मानाचा पुरस्कार आहे. याआधी ज्यांना शिवछत्रपती पुरस्कार मिळाले  त्यांना सरकारकडून घरे दिली गेली होती. त्यावेळी ती घरे 300 फुटांची होती. आता व्यवस्था मोठी झाली आहे. त्यामुळे 500 फुटांची घरे द्यायला हवीत. त्यामुळे काहीच फरक पडणार नाही," असा सल्लाही खासदार शेट्टी यांनी दिलाय.


दरम्यान, खासदार गोपाळ शेट्टी यांनी केलेली टीका ही माजी मुख्यमंत्र्याच्या पत्नीविषयी आहे की विद्यमान मुख्यमंत्री यांच्या पत्नी याबाबत कोणतीही माहिती मिळालेली नाही. त्यामुळे विविध चर्चा सध्या सुरु आहेत.