भाजपचे खासदार अजित पवारांच्या भेटीला, बहुमत चाचणी दिवशी भेटीमागे उत्सुकता
भाजप खासदार प्रतापराव चिखलीकर हे अजित पवार यांची भेट घेणार आहेत.
मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र विकासआघाडी सरकारचा विश्वासदर्शक ठराव आज विधानसभेत मांडला जाणार आहे. त्याआधी भाजपकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना शह देण्यासाठी भाजपकडून फिल्डींग लावण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून नांदेडचे भाजप खासदार प्रतापराव चिखलीकर हे राष्ट्रवादीचे बंडखोर नेते अजित पवार यांची भेट घेणार आहेत. त्यामुळे या भेटीकडे लक्ष लागले आहे. महाराष्ट्र विकासआघाडीचे सरकार होण्याआधीच अजित पवार यांनी बंड करत भाजपला साथ दिली. त्यांच्या मदतीने भाजपचे सरकार आले होते. तीन साडेतीन दिवसातच कोसळले. आता पुन्हा भाजप ठाकरे सरकारला शह देण्यासाठी हालचाली करत आहेत. त्याचाच एक भाग हा समजला जात आहे.
दरम्यान, मुंबईतील हॉटेल ग्रँड हयातमध्ये आम्ही १६२ असे महाराष्ट्र विकासआघाडीने जोरदार शक्तिप्रदर्शन केले होते. आता विधानसभेत आज खरे शक्तिप्रदर्शन होणार असून, सत्ताधारी आमदारांची संख्या १६२ पेक्षा वाढणार का, याकडं सगळ्यांचे लक्ष लागले आहे. महाराष्ट्र विकासआघाडीकडून १७० पेक्षा जास्त संख्या आमच्याकडे आहे, असा दावा केला आहे. तर दुसरीकडे बहुजन विकास आघाडीचे तीन, समाजवादी पार्टी, प्रहार जनशक्तीचे प्रत्येकी दोन आणि शेतकरी कामगार पक्ष, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना यांचे प्रत्येकी एक आमदार आणि सात अपक्ष आमदार सरकारच्या पाठिशी आहेत. यात आणखी वाढ होण्याची शक्यता असल्याचे शिवसेना नेते संजय राऊत यांनी ट्विट करत म्हटले आहे.
शिवसेनेचे सुनील प्रभू, काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक हे सरकारवरील विश्वासदर्शक ठराव मांडणार आहेत. दुपारी २ वाजता सत्ताधारी महाराष्ट्र विकासआघाडीकडून विश्वासदर्शक ठराव मांडला जाणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारचा विश्वासदर्शक ठराव आवाजी मतदानाने मंजूर होण्याची शक्यता आहे.