भाजपकडून `कोविडचा भ्रष्टाचार` पुस्तिकेचे प्रकाशन, महाविकासआघाडीवर आरोप
विधिमंडळ अधिवेशन सुरू असतांना भाजपने `कोविडचा भ्रष्टाचार` या पुस्तिकेचे आज प्रकाशन केले.
मुंबई : विधिमंडळ अधिवेशन सुरू असतांना भाजपने 'कोविडचा भ्रष्टाचार' या पुस्तिकेचे आज प्रकाशन केले. मुंबई महानगर भागातील कोविड संदर्भात महाविकास आघाडीने खास करून शिवसेनेने केलेल्या भ्रष्टाचाराचा पर्दाफाश या पुस्तिकेत केल्याचा दावा भाजपने केला आहे.
'मुंबईमध्ये कोविड काळात जो प्रंचड मोठं भ्रष्टाचार झाला आहे. त्या घटनांचं संकलन करुन आमदार अमित साटम यांनी ही पुस्तिका तयार केली आहे. ही पुस्तिका भेट म्हणून मुख्यमंत्र्यांना देखील पाठवणार आहोत. मुंबईकरांना देखील कोरोनाच्या नावाखाली कोणी आपलं चांगभलं करुन घेतलं हे समजणार आहे.' असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भाषणावर देखील टीका केली. 'सरकारच्या भ्रष्टाचारामुळे महाराष्ट्र बदनाम होत आहे. त्यांना माहित होतं की, आम्हाला बोलायची संधी मिळाली तर त्यांच्या वक्तव्याची चिरफाड होईल. त्यामुळे अध्यक्षांवर दबाव टाकून आम्हाला बोलू दिलं नाही.'
कोरोना काळातील ज्या घटना आम्ही बाहेर काढल्या त्यावर मुख्यमंत्री काहीच बोलले नाही. महाराष्ट्रावर ते बोललेच नाही. त्यामुळे भ्रमनिरास झाला. अशी टीका देखील फडणवीसांनी केली.