#MeToo: दोषी असणाऱ्यांना फासावर लटकवा- उद्धव ठाकरे
पाच-दहा वर्षानंतर आरोप करून तुम्ही कोणाकडून न्यायाची अपेक्षा करत आहात?
मुंबई: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी झालेल्या दसरा मेळाव्यात #MeToo मोहिमेसंदर्भात भाष्य केले. सध्या अनेकांवर लैंगिक शोषणाचे आरोप होत आहेत. याचा सोक्षमोक्ष लागलाच पाहिजे. जे सत्य आहे, ते जगासमोर आले पाहिजे. यामध्ये जो कोणी दोषी आढळेल, मग ती कितीही मोठी व्यक्ती असो, त्याला फासावर लटकवा, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
मात्र, मी महिलांना इतकं सांगू इच्छितो की, पाच-दहा वर्षानंतर आरोप करून तुम्ही कोणाकडून न्यायाची अपेक्षा करत आहात?
निर्भया बलात्कार प्रकरणातील आरोपी दोषी असूनही अजूनही ते फासावर लटकवले गेलेले नाहीत.
त्यामुळे महिलांनी अन्याय झाल्यावर वाट न बघता तेव्हाच आवाज उठवायला हवा. शिवसैनिक तुमच्यासोबत उभे राहतील, असे उद्धव ठाकरेंनी म्हटले.
यावेळी उद्धव ठाकरेंनी आगामी वाटचालीसंदर्भात सूचक भाष्यही केले. २०१९ च्या निवडणुकीत काय घडेल ते माहिती नाही. मात्र, जर काही घडलंच तर ते मीच घडवेन, असेही यावेळी उद्धव यांनी सांगितले.