रेडी रेकनरच्या दराची फाईल कुठे `लक्ष्मीदर्शन` करतेय? भाजपचा सवाल
रेडी रेकनरच्या दराच्या मुद्द्यावरून भाजपने महाविकासआघाडी सरकारवर निशाणा साधला आहे.
अमित जोशी, झी मीडिया, मुंबई : रेडी रेकनरच्या दराच्या मुद्द्यावरून भाजपने महाविकासआघाडी सरकारवर निशाणा साधला आहे. पुण्याहून निघालेली रेडी रेकनरची फाईल बिल्डरांच्या कार्यालयातून 'टोल' गोळा करत तर मुंबईत येत नाही ना? तिघाडीच्या भांडणात अडकली तर नाही ना? मुंबई-पुणे एक्सप्रेस वे असताना ही फाईल सत्ताधाऱ्यांसाठी पदयात्रा करुन 'लक्ष्मीदर्शन' तर करीत नाही ना?, असे सवाल भाजप आमदार आशिष शेलार यांनी विचारले आहेत.
राज्य सरकारने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुद्रांक शुल्क कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचे स्वागत शेलार यांनी केले. मात्र मार्च महिन्यात रेडी रेकनरचे दर जाहीर होणे अपेक्षित असतांना, ते अजून का जाहीर झालेले नाहीत? असा प्रश्न शेलार राज्य सरकारला विचारला आहे.
घर खरेदी करताना भराव्या लागणाऱ्या मुद्रांक शुल्क म्हणजेच स्टॅम्प ड्युटी कमी करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. कोरोना संकटामुळे अर्थव्यवस्था अडचणीत आली आहे, त्यामुळे नागरिकांना दिलासा देण्यासाठी मुद्रांक शुल्कात १ सप्टेंबरपासून ३१ डिसेंबरपर्यंत ३ टक्के सूट आणि १ जानेवारी ते ३१ मार्चपर्यंत २ टक्के सूट दिली जाणार आहे.
शहरी भागांमध्ये सध्या ५ टक्के स्टॅम्प ड्युटी घेतली जात आहे, आता १ सप्टेंबरपासून ३१ डिसेंबरपर्यंत २ टक्के, तर १ जानेवारी ते ३१ मार्चपर्यंत ३ टक्के स्टॅम्प ड्युटी भरावी लागणार आहे. ग्रामीण भागात सध्या ४ टक्के स्टॅम्प ड्युटी आकारली जात आहे. त्याऐवजी १ सप्टेंबरपासून ३१ डिसेंबरपर्यंत १ टक्के आणि १ जानेवारी ते ३१ मार्चपर्यंत २ टक्के स्टॅम्प ड्युटी घेण्यात येईल.