सागर कुलकर्णी, झी मीडिया, मुंबई : महाराष्ट्र विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या 6 जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. या सहा जागांमध्ये मुंबईतील दोन जागांचा समावेश असून मुंबई महापालिकेतील (Mumbai Municipal Corporation) पुरेशा संख्याबळामुळे शिवसेना (Shiv Sena) आणि भाजपसाठी (BJP)सोपा पेपर असणार आहे. या निवडणुकीत भाजपकडून उत्तर भारतीय किंवा बिहारी चेहरा उमेदवार म्हणून देण्याच्या हालचाली सुरू आहेत.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सध्याचं मुंबई महापालिकेतील (BMC) नगरसेवकांचं संख्याबळ पाहता शिवसेना आणि भाजप प्रत्येकी एका जागेवर सहज विजयी होऊ शकते. विधान परिषदेचे विद्यमान सदस्य रामदास कदम हे शिवसेनेतून तर काँग्रेस पक्षाकडून भाई जगताप यांच्या दोन जागांवर कार्यकाळ संपत आहे. या रिक्त होणाऱ्या जागांवर शिवसेना मराठी चेहरा उमेदवार देईल अशी शक्यता आहे. 


त्याच वेळी भाजपाकडून भाजपाच्या उपाध्यक्ष चित्रा वाघ (Chitra Wagh) यांचे नाव चर्चेत असतानाच मुंबई भाजपाच्या कोअर कमिटीची बैठक विरोधी पक्षनेते देवेंद्र फडवणीस आणि भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत झाली. या बैठकीत आगामी महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवत भाजप मुंबईतून उत्तर भारतीय अथवा बिहारी चेहऱ्याला उमेदवारी देण्याची शक्यता अधिक असल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे.


मुंबईतून भाजपाकडून कुणाची नावे चर्चेत...
भाजपात नुकतेच प्रवेश केलेले कृपाशंकरसिंग तसंच मुंबई भाजपा सरचिटणीस असलेले संजय उपाध्याय, संजय मिश्रा, संजय पांडे, राजहंस सिंग या नेत्यांची नावं प्रामुख्याने चर्चेत आहेत. कोअर कमिटीत देखील मुंबई महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवत तसंच उत्तर प्रदेशात असणाऱ्या निवडणुका लक्षात घेता विधान परिषदेची उमेदवारी देण्याकडे सर्वच नेत्यांची भूमिका होती.