अमित जोशी, झी मीडिया, मुंबई: राज्यातील विधानपरिषदेच्या नऊ जागांसाठी येत्या २१ मे रोजी होत असलेल्या निवडणुकीसाठी भाजपकडून पक्षातील नव्या दमाच्या शिलेदारांना संधी दिली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे एकनाथ खडसे, विनोद तावडे, पंकजा मुंडे आणि चंद्रशेखर बावनकुळे या प्रस्थापितांना पुन्हा बाकावरच बसून राहावे लागेल, अशी चिन्हे दिसत आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, भाजपकडून विधानपरिषदेसाठी प्रवीण दटके (नागपूर), गोपीचंद पडाळकर, रणजितसिंह मोहिते पाटील आणि नांदेडचे अजित गोपछडे यांच्या नावाची चर्चा आहे. त्यामुळे भाजपला विधानपरिषदेत प्रस्थापितांऐवजी नवे चेहरे पाठवण्यात अधिक रस असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात झाली आहे.
 
भाजपच्या या धोरणामुळे पक्षातील प्रस्थापितांवर पुन्हा बाकावर बसण्याची वेळ आली आहे. यापूर्वी विधानसभा निवडणुकीवेळी भाजप नेतृत्त्वाने चंद्रशेखर बावनकुळे, एकनाथ खडसे आणि विनोद तावडे यांना उमेदवारी नाकारली होती. तर पंकजा मुंडे यांचा परळी मतदारसंघात पराभव झाला होता. त्यामुळे हे सर्व नेते पुनर्वसनाच्या प्रतिक्षेत होते. एकनाथ खडसे यांनी अलीकडे राज्याच्या राजकारणात सक्रिय होण्याची इच्छाही बोलून दाखवली होती. तर काही महिन्यांपूर्वी पंकजा मुंडे आणि एकनाथ खडसे यांनी गोपीनाथ गडावर जोरदार शक्तीप्रदर्शनही केले होते. त्यामुळे भाजपकडून या नेत्यांना विधानपरिषदेवर पाठवले जाईल, असा अंदाज होता. मात्र, सध्या सुरु असलेली एकूण चर्चा पाहता या नेत्यांच्या स्वप्नांवर पुन्हा पाणी फेरले जाण्याची शक्यता आहे. 

COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान, सध्याच्या संख्याबळानुसार विधानपरिषदेत भाजपच्या तीन जागा सहज निवडून येऊ शकतात. चौथ्या जागेसाठी काही मतं कमी पडतील त्यामुळे भाजप मित्रपक्ष आणि अपक्षांची मदत घेण्याच्या तयारीत आहे. 
ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी भाजपला ४, शिवसेनेला २, राष्ट्रवादीला २ तर काँग्रेसला एका जागेवर निवडणूक लढवावी लागणार आहे. मात्र, काँग्रेस दोन जागा लढवण्यासाठी हट्टाला पेटली आहे. या निवडणुकीत प्रत्येक सदस्याला जिंकण्यासाठी २९ मते हवी आहेत. ऐनवेळी काँग्रेसने आपला उमेदवार रिंगणात उतरवल्यास या निवडणुकीत चुरस निर्माण होण्याची शक्यता आहे.