Disha Salian News : दिवंगत अभिनेता सुशांतसिंग राजपूत (Sushant Singh Rajput) याची मॅनेजर दिशा सालियन (Disha Salian Death) मृत्यू प्रकरणामध्ये महत्त्वाची माहिती समोर आली आहे. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या सीबीआयने (CBI) दिशाच्या मृत्यूबाबत महत्त्वाचा खुलासा केला आहे. दिशाचा मृत्यू हा अपघाताने झाला असल्याचे सीबीआयने आपल्या अहवालात म्हटले आहे. त्यानंतर आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (sanjay raut) यांनी याप्रकरणी भाजप नेत्यांनी आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांची माफी मागावी असे म्हटले आहे. भाजप आमदार नितेश राणे यांच्यासह अन्य भाजप नेत्यांनी या प्रकरणी आदित्य ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दिशाच्या आत्महत्येनंतर काही दिवसांनी सुशांतचा देखील मृत्यू झाला होता. दिशा सालियन हिने सुशांतच्या काही दिवसांआधीच आत्महत्या केली होती. दिशाने इमारतीच्या चौदाव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली होती. दिशाच्या घरी पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. या पार्टीला दिशा, तिचा होणारा पती रोहन, आणि मित्र हिमांशू, नील व दीप हे उपस्थित होते. फोनवर बोलत असतानाच दिशा दुसऱ्या रुममध्ये गेली आणि दरवाजा आतून बंद करून घेतला. बराच वेळ झाल्यामुळे दिशाच्या मित्रांनी दरवाजा तोडला. मात्र दिशा रुममध्ये नव्हती. दिशाने इमारतीवरुन उडी घेत आत्महत्या केली होती


"ज्या भाजपच्या नेत्यांनी आणि महिला नेत्यांनी आरोप केले आहेत त्यांनी ताबडतोब आदित्य ठाकरेंची माफी मागायला हवी. आरोप केले आहेत तर आता माफी मागा. सीबीआयचा अहवाल आलेला आहे त्यामुळे तुम्ही तोंडाची थुंकी कशाला उडवत होतात आणि एका तरुण नेत्याला कशाला बदनाम करत होतात?" असा सवाल संजय राऊत यांनी केला आहे.


दरम्यान, संजय राऊत यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई यांनी केलेल्या विधानावरही भाष्य केले. "महाराष्ट्रामध्ये अत्यंत कमजोर आणि हतबल सरकार बसलं आहे आणि त्यांना महाराष्ट्र समजलेला नाही. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यासोबत चर्चा करु त्यांनी जाहीर केले. लगेचच कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी जत तालुक्यावर दावा सांगितला आहे. कर्नाटकात भाजपचे सरकार आहे. महाराष्ट्रात भाजपच्या नेतृत्वाखाली मिंधे सरकार आहे. महाराष्ट्र कुरतडण्याचे काम गेल्या तीन महिन्यांपासून सुरु आहे," असे संजय राऊत म्हणाले.