मुंबई : वांद्रे कुर्ला संकुलातील कलानगर येथील वाहतूक बेटाला आज मानबिंदू ठरावा अशा, शिल्पोद्यानाची भेट मिळाली. येथे वाहनांची मोठी वर्दळ असते. तसेच हे ठिकाण आंतरदेशीय आणि आंतरराष्ट्रीय विमानतळांच्या जवळ असल्याने या स्थानाची निवड करण्यात आली. महाराष्ट राज्याचे पर्यावरण मंत्री मान.श्री.आदित्य ठाकरे आणि मुंबई महानगर आयुक्त मान. श्री. आर. ए.राजीव यांच्या हस्ते आज त्याचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला. याप्रसंगी मान. श्री. एकनाथ शिंदे, मान. अनिल परब, झिशान सिद्दीकी, श्रीमती किशोरी पेडणेकर आदी मान्यवर उपस्थित होते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कलानगर वांद्रे (पूर्व)येथील वाहतूक बेटावर साकारण्यात आलेले बी के सी शिल्पोद्यान मानव आणि रमणीय भूप्रदेश यांच्यातील नात्याची संपुष्टी करते. कला, मानव आणि निसर्ग यांचा त्रिवेणी संगम साधणारे असे हे स्थान आहे. ' ट्रिनिटी आर्ट इम्पॅक्ट' ने ही कलाकृती आणि सुशोभीकरण साकारण्यात सहाय्य केले असून त्यात शिल्प आणि कारंजे यांचा समावेश केला आहे.


हिरव्यागार वनस्पतींच्या सान्निध्यात लोह आणि सिमेंटने उभारलेले हे भव्य शिल्प मुंबईच्या आत्म्याच्या व्यक्तिमत्वाचे दर्शन घडवते. अत्यंत सुंदर अशी ही कलाकृती 'मेकर मॅक्स सिटी' च्या कार्पोरेट सामाजिक उत्तरदायित्व(CSR) निधीतून साकारण्यात आली आहे. 



हिंदू आणि बौद्ध तत्वज्ञानात अंतर्भूत संस्कृत साहित्यातील 'अतिथी देवो भव' ( पाहुण्यांना देवाचा मान द्यावा) या संकल्पनेवर हे कारंजे आणि शिल्प आधारित असून ही कल्पना आर.ए. राजीव यांची आहे. कलानगर, वांद्रे(पूर्व) येथील विस्तीर्ण वाहतूक बेटावर साकारलेल्या २८ हजार चौरस फूट क्षेत्रफळाच्या या उद्यानाच्या निर्मितीची सुरुवात २०१९ च्या ऑगस्ट महिन्यात झाली. हे शिल्पोद्यान आज लोकार्पण केले  असून आता लोक त्यात फेरफटका मारू शकतील.