Babri Mosque Demolition: बाबरी ना शिवसेनेने पाडली, ना बाळासाहेबांनी - चंद्रकांत पाटील
Babri Demolition: चंद्रकांत पाटील यांनी झी 24 तासला दिलेल्या विशेष मुलाखतीमध्ये यासंदर्भात भाष्य केलं असून त्यांनी बाबरी पडली तेव्हा आपण स्वत: अयोध्येत होतो असंही म्हटलं आहे.
Chandrakant Patil On Babri Masjid: बाबरी मशीद उद्ध्वस्त करण्यात एकाही शिवसैनिकाचा सहभाग नव्हता, असा खळबळजनक दावा उच्च शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. झी 24 तासचे संपादक निलेश खरे यांनी 'ब्लॅक अॅण्ड व्हाइट' या कार्यक्रमात घेतलेल्या विशेष मुलाखतीमध्ये चंद्रकांत पाटलांनी हे विधान केलं आहे. या मुलाखतीमध्ये चंद्रकांत पाटील यांनी आपण त्यावेळी व्यवस्थापनासंदर्भातील कामासाठी अयोध्येमध्ये स्वत: उपस्थित होतो असंही सांगितलं आहे.
बाळासाहेबांनी जबाबदारी घेतली म्हणजे काय?
बाबरी प्रकरणासंदर्भात या मुलाखतीमध्ये बोलताना चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी त्यावेळी जबाबदारी स्वीकारली पण तिथे अयोध्येत शिवसेना गेली होती का? बाळासाहेब गेले होते का? असे प्रश्न उपस्थित केले. "त्यावेळेचा ढाचा पडल्यानंतर हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंनी म्हटलं की होय, याची जबाबदारी मी घेतो. जबाबदारी घेतो म्हणजे काय? बाळासाहेब तिथे गेले होते, शिवसेना तिथे गेली होती का बजरंग दिलं तिथे होतं? कारसेवक कोण होते? काही एवढं जनरलाइज करण्याचं कारण नाही. कारसेवक हिंदू होते. कारसेवक बजरंग दल आणि दुर्गा वहिनींच्या नेतृत्वाखाली गेले होते. ते असे नव्हते की हम बजरंग दल का नाम नही लेंगे. हम ना शिवसेना के नाही, बजरंग दल के नही असं त्यांचं नव्हतं. सगळ्यांनी नेतृत्व मान्य केलं होतं. की ये कर सकते है आणि त्यांनी केलं ते," असं चंद्रकांत पाटील म्हणाले.
बाबरी ज्यांनी पाडली ते शिवसैनिक नव्हते?
या विधानानंतर निलेश खरे यांनी पुन्हा एकदा, "बाबरी पाडली ते शिवसैनिक नव्हते?" असा प्रश्न चंद्रकांत पाटलांना विचारला. यावर उत्तर देताना चंद्रकांत पाटील यांनी, "बाबरी ज्यांनी पाडली ते कदापी शिवसैनिक नव्हते. मला महिनाभर नेऊन ठेवलं होतं. बिहारचे उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी, हरेंद्र कुमार आम्ही 3 राष्ट्रीय सरचिटणीसांना तिथं कॉम्बिनेशनमध्ये ठेवलं होतं. संध्याकाळच्या सभा होणं, संताची व्यवस्था वगैरे ठेवली होती. काहीही होवो, ढाचा पडो न पडो पण सगळ्यात शेवटी तुम्ही तिघांनी बाहेर पडायचं असं सांगितलं होतं. मी बाहेर पडलो तेव्हा अयोध्येच्या रस्त्यावर," असं सांगितलं. तसेच पुढे, "अशा वातावरणात काम केलेले आम्ही. त्यावेळेस स्वर्गीय बाळासाहेबांनी म्हटलं की याची जबाबदारी मी घेतो. जबाबदारी मी घेतो म्हणून तुम्ही काय तुमचे चार सरदार तिथे पाठवले होते का?" असा सवालही चंद्रकांत पाटलांनी उपस्थित केला.