आतिश भोईर, झी मीडिया, कल्याण : उल्हासनगरच्या (Ulhasnagar) शहाडजवळील सेंच्युरी रेयॉन कंपनीत (Century Company) भीषण स्फोट झाल्याची घटना घडली आहे. या स्फोटामध्ये तीन कामगारांचा मृत्यू झाला असून पाचजण जखमी झाले आहेत. जखमी कामगारांना सेंच्युरी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. या कंपनीमधील CS2 या डिपार्टमेंटमध्ये सकाळी बारा वाजण्याच्या सुमारास जोरदार स्फोट झाला आहे. या स्फोटानंतर आगीवर नियंत्रण आणण्याचं काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आलं आहे. आग अधिक पसरू नये म्हणून अग्निशमन दलाकडून काळजी घेतली जात आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या कंपनीत नायट्रोजनच्या टँकरमध्ये सी.एस.टू हे केमिकल भरत असताना टँकरचा स्फोट होऊन ही दुर्घटना घडली. स्फोट इतका भीषण होता की आजूबाजूच्या तानाजीनगर, शहाड गावठाण, गुलशन नगर, शहाड फाटक, धोबीघाट, शिवनेरी नगर या परिसरातील घरांना हादरे बसल्याने नागरिक भयभीत झाले आहेत. दुर्घटना झाल्यानंतर कंपनी प्रशासनाने गेट बंद करून भाजपा आमदार कुमार आयलानी आणि प्रसार माध्यमांना देखील आत जाण्यास मज्जाव केला. दरम्यान सेंचुर रेयॉन या नामांकित कंपनी  प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे ही दुर्घटना झाल्याची शक्यता वर्तवली जातीय. दरम्यान जखमींना कंपनीच्याच रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलाय.


शैलेश यादव, अनंता यादव, राजेश श्रीवास्तव अशी मृतांची नावे आहेत. तर सागर झालटे, पंडित मोरे, हंसराज सरोज प्रकाश निकम अशी जखमी झालेल्या कामगारांची नावे आहेत.


"सकाळी साडेदहा ते पावणे अकराच्या दरम्यान, सेंच्युरी कंपनीत नायट्रोजन टॅंकरमध्ये सी.एस.टू हे केमिकल भरत असताना हा स्फोट झाला. यामध्ये दोघांचा मृत्यू झाला असून पाच कामगार जखमी आहेत. त्यातील चौघांवर सेंच्युरी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर एका जखमीला फोर्टिस रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कोणी स्फोटामध्ये बेपत्ता आहे का याचा तपास आता सुरु करण्यात आला आहे. औद्योगिक विभागाचे लोक इथे येऊन तपास करतील. मिळालेल्या माहितीनुसार, स्फोट झाला त्यावेळी चार ते पाच कामगार त्या ठिकाणी होते," अशी माहिती पोलिस उपायुक्त अमोल कोळी यांनी दिली.