मुंबई : चेंबूरमधल्या भारत पेट्रोलियमच्या कंपनीत स्फोट झाल्यामुळे भीषण आग लागलीय. या आगीत ४२ कर्मचारी जखमी झालेत तर एक जण गंभीर आहे. तर २१ जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. तर आणखी काही कर्मचारी आगीत अडकल्याची भीती काही कर्मचाऱ्यांनी व्यक्त केलीय. त्यामुळे संभ्रमाचं वातावरण आहे. तर दुसरीकडे अग्निशमन दलाचे जवान आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न करत आहेत. मात्र हायड्रोजन प्लांटमध्ये आग लागल्यामुळे हायड्रोजन आणि ऑक्सिजन संपल्याशिवाय ही आग विझणार नसल्याचं बोललं जातंय. त्यामुळे ऑक्सिजनचा पुरवठा थांबवण्याचं आव्हान अग्निशमन दलासमोर आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अग्निशमन दलाच्या २० गाडया आग विझवण्याचा युद्धपातळीवर प्रयत्न करत आहेत. दुपारी तीन वाजता हा स्फोट झाला. रिफायनरमधील बॉयलरचा स्फोट होऊन आग भडकली. बीपीसीएलचा अग्निशमन विभाग आणि मुंबई अग्निशमन दल ही आग नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत. या रिफायनरी प्लान्टच्या बाजूला झोपडपट्टीचा परिसर आहे. खबरदारी म्हणून या झोपडपट्टीतल्या रहिवाशांना सुरक्षित स्थळी हलवण्यात येत आहे.



भूकंप झाल्यासारखे धक्के जाणवल्याने बाजूच्याच माहुलगाव, गव्हाणपाडा आणि विष्णूनगर झोपडपट्टीतील लोक घाबरून घराबाहेर पडले. त्यानंतर लगेच धूर आणि आगीचे प्रचंड लोळ उठल्याने लोक आणखीनच हादरले. त्यामुळे या परिसरात एकच गोंधळ झाला. या स्फोटाचे आवाज येताच भारत पेट्रोलिएमच्या अग्निशमन दलाने आग विझवण्याचे प्रयत्न सुरु केलेत.