मुंबईत कोरोनातून बऱ्या झालेल्या चार जणांमध्ये अँटीबॉडीज; आता प्लाझ्मा थेरपीला सुरुवात
या रुग्णांच्या शरीरातील प्लाझ्मा काढून आता त्याद्वारे मुंबईतील इतर रुग्णांवर उपचार केले जातील.
मुंबई: गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्यामुळे चिंतेत पडलेल्या मुंबईतील आरोग्य यंत्रणेला लवकरच दिलासा मिळण्याची शक्यता आहे. कोरोनातून पूर्णपणे बरे झालेल्या मुंबईतील चार रुग्णांच्या शरीरात COVID19 विषाणूचा सामना करण्यासाठीच्या अँटीबॉडीज मिळाल्या आहेत. नुकतीच या रुग्णांची अँटीबॉडी टेस्ट करण्यात आली होती. ही टेस्ट पॉझिटिव्ह आल्याने आता प्लाझ्मा थेरपीचा मार्ग मोकळा झाला आहे.
या रुग्णांच्या शरीरातील प्लाझ्मा काढून आता त्याद्वारे मुंबईतील इतर रुग्णांवर उपचार केले जातील. त्यामुळे आता पालिकेने कोरोनातून पूर्णपणे बरे झालेल्या लोकांना पुढे येण्याचे आवाहन केले आहे. या लोकांनी प्लाझ्मा डोनेशन करावे. जेणेकरून शहरातील कोरोनाच्या इतर रुग्णांवर उपचार करता येतील, असे पालिकेच्यावतीने सांगण्यात आले आहे.
coronavirus : जाणून घ्या काय आहे प्लाज्मा थेरेपी
मुंबईतील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा ५,४०७ इतका झाला आहे. येत्या १५ मे पर्यंत मुंबईतील करोना रुग्णांची संख्या ७० हजारापर्यंत जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे मुंबई महानगपालिका आणि आरोग्य यंत्रणेकडून युद्ध पातळीवर प्रयत्न सुरु आहेत.
कोरोना रुग्णांची संख्या रोखण्यासाठी पालिका कॉन्टॅक्ट ट्रेसिंगवर भर देणार आहे. त्यासाठी पालिकेने स्वतंत्र टीम तयार केली आहे. अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचून चाचण्या सुरू आहेत. त्यात पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांना पालिका शाळांमध्ये व्यवस्था केलेल्या ठिकाणी उपचार सुरू केले आहेत.
१६ मे नंतर भारतात कोरोनाचा नवा रुग्ण नाही; नीती आयोगाच्या सदस्याचा दावा
मुंबईतील २४ पैकी १७ वॉर्डमध्ये कोरोनाचे १०० पेक्षा अधिक रूग्ण आहेत. वरळीचा भाग येत असलेल्या जी दक्षिण विभागात आतापर्यंत सर्वाधिक ६०० रूग्ण तर ई विभागात ४६६ रूग्ण आढळून आले आहेत. तर धारावी परिसर हा शहरातील कोरोनाचा मुख्य हॉटस्पॉट आहे. हा परिसर अत्यंत दाटीवाटीचा आहे. त्यामुळे याठिकाणी कोरोना नियंत्रणाबाहेर गेल्यास मुंबईत मोठी मनुष्यहानी होण्याचा धोका आहे. धारावीतील अनेक भाग सील करूनही या परिसरात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे.