डेडलाईन संपली, किती मराठी पाट्या लागल्या? मुंबई पालिकेची इतक्या दुकानांवर कारवाई
Mumbai : मुंबईतील दुकानांवर मराठी पाट्या (Marathi Patya) लावण्याची मुदत 27 तारखेला संपली. आता मराठी पाट्या न लावणाऱ्या दुकानदारांवर मुंबई महापालिकेकडून (BMC) दंडात्मक कारवाई सुरु करण्यात आली आहे. तर मनसेनं (MNS) पुन्हा एकदा खळखट्ट्याकचा इशारा दिलाय.
Marathi Name Plate in Mumbai Shops : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार बृहन्मुंबई महानगरपालिका (Mumbai Municipal Corporation) कार्यक्षेत्रातील दुकानं आणि आस्थापनांवर मराठी देवनागरी लिपित, ठळक अक्षरात नामफलक (Marathi Name Plate) लावणं बंधनकारक आहे. या निर्देशांची अंमलबजावणी तपासणी करण्याकरता बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या 24 प्रशासकीय विभागातील दुकाने आणि आस्थापना खात्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या पथकांनी 29 ला 3 हजार 565 दुकाने व आस्थापनांना भेटी दिल्या. तसंच, मराठी नामफलकांची तपासणी केली. या तपासणीत मराठी देवनागरी लिपित, ठळक अक्षरात 3 हजार 414 नामफलक आढळले. तर सर्वोच्च न्यायालयाचे तसंच कायद्यातील निर्देश या आधारे अनुपालन नसलेल्या 161 दुकाने आणि आस्थापनांवर नियमाधीन कारवाई करण्यात आली.
बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाने दुकाने आणि आस्थापनांवरील मराठी नामफलकांच्या तपासणीकामी दुकाने व आस्थापना खात्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची पथकं तैनात केली आहेत. या पथकांनी काल म्हणजे 28 तारखेला 3 हजार 269 दुकाने व आस्थापनांना भेटी दिल्या. या तपासणीत मराठी देवनागरी लिपित ठळक अक्षरात 3 हजार 93 नामफलक आढळले. तर, माननीय सर्वोच्च न्यायालयाचे तसेच कायद्यातील निर्देश या आधारे अनुपालन न केलेल्या 176 दुकाने व आस्थापनांवर नियमाधीन कारवाई करण्यात आली होती.
म्हणजेच, मागील दोन दिवसात मिळून 6 हजार 844 दुकाने व आस्थापनांना भेटी देण्यात आल्या. त्यापैकी 6 हजार 507 दुकाने व आस्थापनांचे नामफलक मराठी देवनागरी लिपित, ठळक अक्षरात आढळले आहेत. तर, 337 दुकाने व आस्थापनांवर कारवाई करण्यात आली आहे. या पुढील काळातही ही कारवाई सुरू राहणार आहे. मुंबईतील सर्व दुकाने व आस्थापनांनी मराठी देवनागरी लिपित ठळक अक्षरात नामफलक लावण्याचे आवाहन महानगरपालिका प्रशासनाने केलं आहे.
मुंबई पालिकेची कारवाई
दुकानांवर मराठी पाट्या लावण्यासाठी सुप्रीम कोर्टानं 25 नोव्हेंबरपर्यंतची मुदत दिली होती. मुंबईत सुमारे 7 लाख दुकानं आहेत. त्यापैकी केवळ 28 हजार दुकानदारांनी मराठी पाट्या लावल्याची आकडेवारी मुंबई महापालिकेनं दिलीय. विशेष म्हणजे दुकानदारांना पाट्या लावण्यासाठी तब्बल तीनवेळा मुदतवाढ देण्यात आली होती. तरीही पाट्या न लावणा-या दुकानांवर मुंबई महापालिने सोमवारपासून दंडात्मक कारवाई सुरू केली आहे. प्रति कर्मचारी 2 हजार रुपये या हिशेबानं दंडआकारणी केली जातेय.
मनसेचा इशारा
वारंवार मुदत वाढवूनही मराठी पाट्या न लावणाऱ्या दुकानदारांविरोधात मनसेनं (MNS) आता आक्रमक पवित्रा घेतला आहे. मराठी पाट्यांबाबत कायदा पाळणार नसाल तर आम्ही कायदा हातात घेऊ, असा इशाराच मनसेनं दिलाय. त्यामुळं पुन्हा एकदा खळखट्ट्याक मोहीम सुरू होणार आहे.