कृष्णात पाटील, झी २४ तास, मुंबई : मुंबई महापालिकेच्या राजकारणात भाजपला आक्रमक तर व्हायचंय मात्र गटनेते मनोज कोटक खासदार झाल्यापासून भाजपला पालिकेत दुसरा चेहराच सापडत नाही. त्यामुळे आता भाजप काय रणनिती आखतंय हे पाहाणं इन्ट्रेस्टिंग ठरणार आहे. राज्यात भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी शिवसेनेनं काँग्रेस राष्ट्रवादीसोबत संधान बांधून सत्ता स्थापन केल्यामुळं भाजप आता सर्वच पातळीवर शिवसेनेला टशन देण्याचा प्रयत्न करतंय. त्यामुळंच शिवसेनेचा जीव असलेल्या मुंबई महापालिकेतही विविध विषयांवरून घेरण्यासाठी भाजप नियोजन करतंय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

२०२२ च्या मुंबई महापालिका निवडणुकीचे रणशिंग भाजप आतापासूनच फुंकत असलं तरी त्यासाठी पालिकेत सत्ताधारी शिवसेनेविरोधात आक्रमक होण्याची गरज आहे. मात्र, सध्या याचाच अभाव दिसून येतोय. त्यासाठीच मुंबई भाजपमध्ये वेगळी रणनिती आखली जातेय.


भाजपमध्ये चाचपणी...


महापालिकेत नगरसेवक असलेले मुलुंडचे मनोज कोटक खासदार झालेत तर घाटकोपरचे पराग शहा आमदार झालेत. त्यामुळं या दोघांना नगरसेवकपदाचा राजीनामा द्यायला सांगून त्या ठिकाणाहून भालचंद्र शिरसाट किंवा प्रवीण छेडा यांना निवडून आणायचे आणि महापालिकेतील भाजपच्या नेतृत्वाची धुरा यांच्याकडं सोपवायची. कारण हे दोन्ही प्रभाग भाजपसाठी अत्यंत सुरक्षित समजले जातात. मुंबई भाजपमध्ये अशा प्रकारच्या बदलांची चाचपणी केली जात असून याला भाजपमधून दुजोरा मिळतोय.



मुंबई महापालिकेत पहारेकऱ्यांच्या भूमिकेत असलेल्या भाजपला आता विरोधकांची भूमिका बजवायची आहे. त्यासाठी भाजप नियोजनबद्ध रणनिती आखत असली तरी दुसरीकडं शिवसेनेला आता काँग्रेस, राष्ट्रवादी आणि सपाचीही साथ मिळणार आहे. त्यामुळे महापालिकेच्या राजकारणातील संघर्ष येत्या काही दिवसांत तीव्र झालेला पहायला मिळणार आहे.