प्रतिनिधी : केईएम रुग्णालयातील एका वॉर्डमध्ये अस्वच्छता, मृतदेह आणि अनागोंदी असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता, तसेच भाजपचे आमदार राम कदम यांनी ट्वीट केला होता. या व्हिडिओबाबत मुंबई महापालिकेने खुलासा केला असून संबंधित व्हिडिओ कर्मचाऱ्यांच्या कामबंद आंदोलन काळातील असल्याचे म्हटले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भाजप आमदार राम कदम यांनी एक व्हिडिओ ट्वीट केला होता. त्यात केईएम रुग्णालयातील वॉर्डमध्ये एकीकडे रुग्णांना जमिनीवर झोपवले आहे, मृतदेह पडून आहेत, तसेच सोशल डिस्टसिंग पाळलं जात नाही, पाण्याच्या बाटल्या आणि कचराही पडला आहे असे दिसत होते. त्याबाबत महापालिकेने प्रसिद्धी पत्रकाद्वारे खुलासा केला आहे.    



महापालिकेने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मंगळवार, दिनांक २६ मे २०२० रोजी केईएम रुग्‍णालयातील कर्मचाऱ्यांनी काही मुद्यांवरुन अचानकपणे कामबंद आंदोलन पुकारले. तथापि, प्रशासनाच्‍या यशस्‍वी मध्‍यस्‍थीनंतर सदर  आंदोलन मागे घेण्‍यात आले. याच आंदोलन कालावधीदरम्‍यान रुग्‍णालयातील स्‍वच्‍छता व रुग्‍णसेवा संबंधित बाबींवर प्रतिकुल परिणाम होणे स्‍वाभाविक होते. मात्र, कामबंद आंदोलन मागे घेण्‍यात आल्‍यानंतर संबंधित कामगार व कर्मचाऱयांद्वारे रुग्‍णालयातील स्‍वच्‍छता व रुग्‍णसेवा अधिक प्रभावीपणे करण्‍यात आली. तसेच त्‍यानंतर निर्धारित वैद्यकीय कार्यवाही क्रमानुसार (Medical Protocol) स्‍वच्‍छता व रुग्‍णसेवा नियमितपणे करण्‍यात येत आहे.


प्रसिद्धी पत्रकात पुढे म्हटले आहे की, कामबंद आंदोलनादरम्‍यान काही प्रवृत्तींद्वारे या कालावधीतील परिस्थितीचे व्हिडिओचित्रण करुन ते समाज माध्‍यमांवर टाकण्‍यात आले. जे नंतर काही प्रमाणात व्‍हायरल झाले आहे. तसेच कामबंद आंदोलन काळातील सदर व्हिडिओचित्रण हे काही प्रसारमाध्‍यमांवरुन देखील प्रसारित करण्‍यात येत आहे. तथापि, सदर व्हिडिओचित्रण ही सध्‍याची वस्‍तुस्थिती नसल्‍याचे प्रशासनाद्वारे कळविण्‍यात येत आहे.


असे व्हिडिओ पसरवू नयेत असे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे. केईएम रुग्‍णालयात अचानक उद्भवलेल्‍या आंदोलनादरम्‍यानच्‍या कालावधीतील व्हिडिओ प्रसारि‍त झाल्यामुळे केवळ वैद्यकीय कामगार – वैद्यकीय कर्मचारी  यांच्याच मनोबलावर नव्हे, तर रुग्‍णांच्‍या व त्यांच्या आप्‍तांच्‍या मनोबलावर देखील याचा मोठा नकारात्मक परिणाम होऊ शकतो. ही बाब लक्षात घेता, बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाद्वारे पुन्‍हा एकदा नम्र आवाहन करण्‍यात येत आहे की, वरील तपशीलानुसार नागरिकांनी वस्‍तुस्थिती लक्षात घेऊन रुग्‍णालयातील सदर व्हिडिओ समाज माध्‍यमांवर प्रसारित करणे टाळावे.



त्‍याचबरोबर प्रसारमाध्‍यमांनी देखील सदर व्हिडिओचित्रण प्रसारित करणे टाळावे, असे आवाहन महापालिकेने केले आहे.