कृष्णात पाटील, मुंबई : जगभरात कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. कोरोनाचा संसर्ग वाढण्यासाठी लोकं ही तितकेच जबाबदार असतात, कारण अनेक लोकं हे नियम पाळत नाहीत. सार्वजनिक ठिकाणी थुंकणे यामुळे देखील कोरोनाचा संसर्ग होऊ शकतो. सध्या मुंबई महापालिका नियम न पाळणाऱ्यांवर कडक कारवाई करत आहे. त्यातच सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्या लोकांकडून महापालिकेने लाखो रुपये दंड म्हणून वसूल केले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सध्या सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्या व्यक्तीकडून 200 रुपये दंड घेतला जातो. पण हा दंड वाढवण्याबाबतच्या प्रस्तावास प्रशासकीय मंजुरी मिळाली आहे. 


सार्वजनिक ठिकाणी थुंकण्यामुळे कोरोनासह इतर रोगांचा प्रसार ही होऊ शकतो. या अंतर्गत आरोग्य सुविधा देण्यासोबतच आरोग्याच्या दृष्टीने प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा अवलंबही सातत्याने करण्यात येतो. याच अनुषंगाने सार्वजनिक ठिकाणी थुंकण्यामुळे कोरोना, क्षयरोग यासारख्या विविध रोगांचा प्रसार होऊ शकतो, ही बाब लक्षात घेऊन सार्वजनिक ठिकाणी थुंकणा-यांवर महापालिकेद्वारे रुपये 200/- एवढा दंड सध्या आकारण्यात येत आहे. 


मात्र, ही रक्कम गेल्या अनेक वर्षांपासून रुपये 200/- इतकीच असल्याने या रकमेत वाढ करण्याची बाब प्रशासनाच्या विचाराधीन आहे. या अनुषंगाने ही दंड रक्कम वाढविण्याबाबत आवश्यक ती कार्यवाही करण्याच्या प्रशासकीय प्रस्तावास महानगरपालिका आयुक्त श्री. इक्बाल सिंह चहल यांनी नुकतीच मान्यता दिली आहे.


सार्वजनिक ठिकाणी थुंकणा-यांवर महापालिकेद्वारे दंडात्मक कारवाई नियमितपणे करण्यात येते. या कारवाई अंतर्गत गेल्या सुमारे 7 महिन्यात 14 हजारांपेक्षा अधिक व्यक्तींकडून सार्वजनिक ठिकाणी थुंकल्याबद्ल तब्बल रुपये 28 लाख 67 हजार 900 इतकी दंड वसुली करण्यात आली आहे. याबाबत एका जनहित याचिकेच्या प्रकरणी मा. उच्च न्यायालयाद्वारे देण्यात आलेल्या आदेशांनुसार ही कारवाई अधिक तीव्र करण्यासोबतच प्रभावी जनजागृती करण्याचे आदेश देखील देण्यात आले आहे.


नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी थुंकू नये, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक ठिकाणी वावरताना आवर्जून मास्क वापरावा, वारंवार हात धुवावेत किंवा सॅनिटाईज करावेत आणि दोन व्यक्तींमध्ये सुरक्षित अंतर राखावे, असे आवाहन पुन्हा एकदा महापालिका प्रशासनाद्वारे करण्यात येत आहे.