मुंबई : कमला मिलमधल्या अग्नीतांडवानंतर कमला मिलवर कारवाई करताना तुम्ही कशी काय कारवाई करता? असं एका राजकीय नेत्यानं मोठ्या आवाजात आपल्याला विचारल्याचा गौप्यस्फोट मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त अजोय मेहता यांनी केलाय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'ऐकणार सर्वांचं, मात्र करणार कायद्याचं' हे आपलं तत्व असल्याचं सांगत, त्याला अनुसरूनच कमला मिलमधली १७ अनधिकृत बांधकामे आपण तोडल्याचं आयुक्तांनी सांगितलं.


तर्कवितर्कांना उधाण


मात्र, दबाव आणणाऱ्या या राजकीय नेत्याचं नाव सांगायला त्यांनी नकार दिलाय. त्यामुळे, थेट आयुक्तांना दमदाटी करणारा तो नेता कोण याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत.


धडक कारवाई...


कमला मिल कंपाऊंडमधील मोजो आणि वन अबव्ह या रेस्टोपब्सना लागलेल्या भीषण आगीनंतर अखेर मुंबई महापालिका आयुक्तांनी कडक पावलं उचलली आहेत. यानुसार मुंबईत अग्निसुरक्षा सेलच्या कामकाजाला रविवारी ७ जानेवारीपासून सुरूवात होणार आहे. यामध्ये हॉटेल, रेस्टॉरंट आस्थापनांमध्ये अग्निप्रतिबंधक यंत्रणा नसल्यास थेट कारवाई केली जाणार आहे. यामध्ये कुठलीही नोटीस न देता त्यांना सील ठोकलं जाईल.


आगीचे खेळ...


मुंबईतल्या कमला मीलमधील आग ही हुक्क्यासाठी पेटवण्यात आलेला कोळशाचा निखारा कारणीभूत ठरल्याचे समोर आलंय. निखाऱ्यातून निघालेल्या ठिणगीचा संपर्क बाजूला असलेल्या कपडयांच्या पडद्यांशी झाल्याने आग पसरण्यास मदत झाली. तसंच आगीच्या खेळामुळेही ही आग लागल्याचा संशय व्यक्त करण्यात आलाय. 


मोजो रेस्टॉरंटमध्ये सुरू असलेल्या हुक्का पार्लरनंच १४ जणांचा बळी घेतल्याचं अग्निशमन दलाच्या अहवालात नमूद करण्यात आलंय. बांबू असलेले शेड, आजूबाजूला  ज्वलनशील पदार्थ आणि वस्तू यामुळं आग भडकण्यास मदत झाली. ही आग नंतर वन अबोव्ह रेस्टॉरंटमध्येही पसरली. या दोन्ही रेस्टॉरंटमध्ये घटनेवेळी २०० ते ३०० ग्राहक हजर होते. बाहेर जाण्याचा मार्ग केवळ लिफ्ट हा एकच असल्यानं आणि पायऱ्यांवर वस्तू ठेवून तो ब्लॉक केल्यानं एकाच वेळी सर्वांना बाहेर पडण्यात अडचण निर्माण झाली. परिणामी वन अबोव्हमधील टॉयलेटमध्ये आसरा घेतलेल्या १४ जणांचा गुदमरून मृत्यू झाला. 


दोन्ही रेस्टॉरंटमध्ये सुशोभिकरणासाठी लगेच पेट घेवू शकतील अशा वस्तूंचा आणि बसणासाठी मोठ्या प्रमाणात तक्के, गाद्या आणि उशांचा वापर केला होता. ज्यामुळं आग भडकण्यास मदत झाली. येथील सुरक्षा रक्षकांनाही बाहेर जाण्याचा मार्ग माहीत नसल्याचे समोर आलं.   


तीन जण फरार घोषित


कमला मिल अग्नीतांडवाला जबाबदार असलेल्या वन अबव पबच्या तिघा मालकांना मुंबई पोलिसांनी फरार घोषित केलं आहे. त्यांचा ठावठिकाणा देणाऱ्यांना एक लाख रुपयांचं बक्षीस ना.म.जोशी मार्ग पोलिसांनी जाहीर केलं आहे.