कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई : पुढच्या वर्षी म्हणजे 2022 मध्ये मुंबई महानगरपालिकेची निवडणूक  (BMC Election 2022) होणार आहे. मुंबई महापालिकेत (BMC) आता नगरसवेकांच्या संख्येत वाढ होणार आहे. मुंबई मनपातील 9 प्रभाग वाढण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला होता. त्यानुसार 227 वरून 236 प्रभाग करण्यात आले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

2001 नंतर लोकसंख्येत झालेली वाढ, वाढलेलं नागरीकरण यामुळे नगरसेवकांच्या संख्येत वाढ करणे गरजेचे होतं,  वाढलेल्या मतदारांच्या संख्येनुसार प्रभाग संख्या वाढवली आहे अशी माहिती राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी दिली होती. 20 वर्षानंतर ही वाढ करण्याची आवश्यकता होती, त्यानुसार 9 प्रभाग वाढवले आहेत. मूलभूत सुविधा देण्यासाठी योग्य व्हावे म्हणून हा निर्णय घेतल्याचं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं होतं.


त्यानुसार मुंबईत 236 वॉर्डच्या पुर्नरचनेचा आराखडा तयार करण्यात आला आहे. 8 मार्च 2022 रोजी नवा महापौर बसवण्याच्या दृष्टीने निवडणूक विभागाची जोरात तयारी सुरु आहे. मुंबई महापालिकेची निवडणूक प्रक्रीया मुदतीत पार पाडण्याकरता प्रशासन सक्षम असल्याचं सांगण्यात आलं आहे.


मुंबईतले नवे 9 वॉर्ड कुठे वाढणार


पश्चिम उपनगरे इथं 4 ते 5 वॉर्ड वाढणार


पूर्व उपनगरांत 3 ते 4 वॉर्ड वाढणार 


मुंबई शहरात 1 वॉर्ड वाढणार


ज्या ठिकाणी नव्या इमारती, वस्त्या, तसंच लोकसंख्येची घनता वाढलीय त्या ठिकाणी नवे वॉर्ड तयार होणार आहेत. आतापर्यंत 54 हजारच्या आसपास एक वॉर्ड होता, आता तो 10 टक्के कमी म्हणजे 52 हजारांच्या दरम्यान असणार होणार आहे. त्यानुसार संपूर्ण आराखडा तयार करण्यात आला आहे.


नव्याने 9 वॉर्ड वाढल्यानं पुर्नरचनेसाठी जादा वेळ लागून निवडणूक पुढे जाईल अशी चर्चा सुरू असली तरी निवडणूक वेळेवर घेण्यासाठी  प्रशासनाची तयारी असल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे. आता आराखड्यानुसार वाढीव 9 वॉर्डच्या अध्यादेशावर राज्यपालांची स्वाक्षरी होण्याची प्रतिक्षा आहे. 


राज्यपालांच्या सहीला वेळ लागला तरी आगामी अधिवेशनात कायदा मंजूर करुन मुंबईतल्या वॉर्डची संख्या 227 वरुन 236 वर नेता येणार आहे. 
तसंच ओबीसी आरक्षणासंदर्भात निर्माण झालेला प्रश्न मुंबई महापालिका निवडणूकीत मात्र अडथळा ठरु शकत नाही. कारण, मुंबईत ओबीसींकरता राखीव जागांची संख्या मर्यादित आहे.