BMC Election : उद्धव ठाकरे आपला बालेकिल्ला राखण्यात यशस्वी होणार?
मुंबई महापालिका निवडणूक काही महिन्यांवर आली आहे. शिवसेनेला खिंडार पडल्याने आता उद्धव ठाकरे यांच्यापुढे नवं आव्हान असणार आहे.
मुंबई : महाराष्ट्रात शिवसेनेविरोधात बंड केलेले आमदार एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) राज्याचे मुख्यमंत्री झाले आहेत. त्यांच्यासोबत शिवसेनेचे 40 आमदारही उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) सोडून गेले आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सध्या त्यांच्या राजकीय कारकिर्दीतील सर्वात कठीण टप्प्यातून जात आहेत. येत्या दोन-तीन महिन्यांत होऊ घातलेल्या बीएमसी निवडणुकीत (BMC election 2022) पुन्हा उद्धव ठाकरे पुनरागमन करू शकतील का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
मुंबई (Mumbai) हा शिवसेनेचा बालेकिल्ला राहिला आहे. पण उद्धव यांच्यावर हिंदुत्वविरोधी टॅग लावल्यानंतर आणि शिंदे आणि भाजप (Eknath Shinde and BJP) युती झाल्याने आगामी काळात उद्धव ठाकरे यांचं आव्हान आणखी कठीण होणार आहेत.
महाराष्ट्राच्या राजकारणात जून महिना ऐतिहासिक ठरला. एकेकाळचे उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय असलेले एकनाथ शिंदे यांनी शिवसेना फोडून थेट पक्षप्रमुखांनाच सवाल केला. स्वत:ला बाळासाहेब ठाकरे यांचा खरा शिवसैनिक असल्याचे सांगून शिंदे यांनी अनेकवेळा उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्वविरोधी पक्षांशी युती करून शिवसेनेच्या तत्त्वांविरुद्ध काम केल्याचे म्हटले. त्यात शिंदे यांचा संदर्भ राष्ट्रवादी आणि काँग्रेससह महाविकास आघाडी (MVA) सरकारचा होता. गेल्या अडीच वर्षांत गुदमरल्यासारखे होत असल्याचे शिंदे यांनी सांगितले.
एकनाथ शिंदे यांनी भाजपशी युती करून शिवसेनेच्या आमदारांना सोबत घेऊन महाराष्ट्राची धुरा सांभाळली. शिवसेनेने व्हीप जारी केल्यानंतरही शिवसेनेच्या आमदारांनी शिंदे यांच्या समर्थनार्थ मतदान करत विधानसभेच्या विशेष अधिवेशनात उद्धव यांना सलग दोन धक्के दिले. प्रथम विधानसभा अध्यक्षाची निवडणूक जिंकली आणि नंतर फ्लोअर टेस्ट सहज पास झाले. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचे आव्हान आता वाढले आहे. उद्धव यांची राजकीय कारकीर्द संपुष्टात येण्याची शक्यताही अनेकांनी वर्तवली आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (BMC election) निवडणुका काही महिन्यांनी होणार असल्याने या अंदाजालाही महत्त्व आहे.
उद्धव ठाकरे, शिवसेना पक्ष आणि 40 आमदार पक्षांतराचा भविष्यातील निवडणुकीत काय परिणाम होईल? बीएमसीच्या निवडणुका जवळ आल्या आहेत. त्याची घोषणा अद्याप झालेली नसली तरी. मात्र या निवडणुका काही महिन्यांत होण्याची शक्यता आहे. सध्याच्या परिस्थितीचा बारकाईने आढावा घेतल्यास उद्धव सेना यावेळी बॅकफूटवर आहे. दुसरीकडे बीएमसी निवडणुकीतही शिंदे आणि भाजपला बाजी मारण्याची सुवर्णसंधी आहे. एकीकडे उद्धव ठाकरे अनेक दिवसांपासून आजारी आहेत. मुख्यमंत्री असतानाही त्यांनी अनेक वेळा घरूनच काम हाताळले. अशा स्थितीत आदित्य ठाकरे लवकरच पक्षाची कमान सांभाळतील, अशी चर्चा आहे.
शिवसेनेच्या शिंदे यांच्या नेतृत्वाखालील गटाचे नवे व्हीप प्रमुख भरत गोगावले यांनी विश्वासदर्शक ठरावाचे उल्लंघन करणाऱ्या शिवसेनेच्या आमदारांना अपात्र ठरवण्याची नोटीस बजावली होती. पण नोटीसीतून आदित्य ठाकरे यांचे नाव वगळले आहे.
पक्षांतर करणाऱ्यांचे 'पक्षीय पुनरागमन' होण्याची शक्यता असल्याने ते मतदारसंघात मतदारांना सामोरे जाणार आहेत. खरेतर, MVA च्या तीन पक्षांपैकी कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष गेल्या BMC निवडणुकीपूर्वी जागावाटपामुळे स्वतंत्रपणे लढले होते. अशा स्थितीत या वेळीही शिवसेना एकटी लढवून पुनरागमनाची खात्री बाळगू शकेल का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
एकनाथ शिंदे यांनी वेगळा गट बनवल्यामुळे मुंबई महापालिकेतील किती आमदार त्यांच्याकडे जातात हे देखील पाहावं लागणार आहे. बंडखोरी सुरू झाल्यापासून शिवसैनिक रस्त्यावर उतरले. उद्धव ठाकरे यांनी कार्यकर्त्यांपासून नेत्यांपर्यंत अनेकवेळा बैठका घेतल्या आहेत. उद्धव ठाकरे यांच्यापुढे आता शिवसेनेला एकत्र ठेवण्याचे आव्हान असणार आहे.
आरे मेट्रो प्रकल्पाचा वाद
ठाकरे सरकारच्या काळात आरे मेट्रो प्रकल्प (Metro Project in aarey) रद्द झाला. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात हा प्रकल्प आणण्यात आला होता. विशेष म्हणजे माजी नगरविकास मंत्री शिंदे हे देखील त्यावेळी भाजपच्या या निर्णयाविरोधात होते. पण आता शिंदे-फडणवीस सरकार येताच आरेमध्ये लवकरच मेट्रो कारशेड उभारलं जाणार असल्याचा निर्णय घेतला गेलाय.