कृष्णात पाटील, प्रतिनिधी, झी मीडिया, मुंबई : पाच वर्षे झगडूनही ना हक्काचा पीएफ मिळाला, ना पेन्शन... पैशाअभावी कॅन्सरवर उपचार न झाल्यानं एका निवृत्त कर्मचा-याला आपला जीव गमवावा लागला. ही केवळ एकट्या दुकट्याची व्यथा नाहीय. सुमारे दीड हजार निवृत्त शिक्षक आणि कर्मचा-यांचा हा प्रश्न आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सुभाष राणे ऑक्टोबर २०१२ मध्ये ते शिपाई पदावरून निवृत्त झाले. त्यानंतर प्रशासनाच्या लक्षात आलं की त्यांनी ६ वर्षे जादा नोकरी केलीय. त्यामुळं त्यांचा पीएफ, पेन्शन आणि इतर देणी प्रशासनाने थकवली. याप्रकरणी चौकशीही झाली. अतिरिक्त सेवेबाबतचा निर्णय शिक्षणाधिकारी, प्रमुख लेखापाल यांच्या सल्ल्यानुसार घ्यावा, असं चौकशी समितीनं २०१५ मध्ये सांगितलं.


१० टक्क्यांप्रमाणं एका वर्षाचं मूळ निवृत्ती वेतन काढून घ्यावे असा आदेश मार्च २०१६ मध्ये दिला. परंतु हा आदेशही लालफितीच्या कारभारात अडकला. दरम्यानच्या काळात सुभाष राणेंना कॅन्सर आणि किडनीचा आजार झाला. त्यांचा मुलगा राजेश राणे यांनी अनेकदा शिक्षण विभागात हेलपाटे मारले. आयुक्त, उपायुक्त, शिक्षण समिती अध्यक्षांशी पत्रव्यवहार केला. प्रत्यक्ष भेटून किमान वडिलांच्या उपचारासाठी तरी पैसे मिळावेत, अशी विनंती केली.


झी हेल्पलाईनशी संपर्क केल्यानंतर संबंधित रिपोर्टरनेही अधिकारी, शिक्षण समिती अध्यक्षांना भेटून मदत करण्यास सांगितलं. एवढं करूनही या दगडांना पाझर फुटलाच नाही. सुभाष राणेंवर पैशाअभावी उपचार होऊ शकले नाहीत आणि गेल्या ऑक्टोबरमध्ये त्यांचा मृत्यू झाला.


सुभाष राणे आयुष्याच्या फे-यातून सुटले. परंतु शिक्षण विभागातील सुमारे दीड हजार निवृत्त कर्मचा-यांची मात्र या फे-यातून सुटका झालेली नाही. गेल्या २-३ वर्षांपासून त्यांचं पीएफ, पेन्शन मिळालेलं नाही. शिक्षण विभागातील अधिका-यांचे हात ओले केल्याशिवाय फायली पुढे जात नसल्याचा आरोप नगरसेवकांनी केलाय.


आयुष्यभराची जमापुंजी स्वत:च्याच उपचारासाठी उपयोगी पडत नसेल तर यासारखी दुर्देवी बाब ती कुठली..? मुंबई महापालिकेचे ६० हजार कोटी रुपये बँकेत पडून असतानाही निवृत्त कर्मचा-यांची देणी मात्र लालफितीच्या कारभारात अडकून पडलीयत.