नवजात बालकांचं मृत्यू प्रकरण, मुंबई मनपा आरोग्य समिती अध्यक्षांचं बेजबाबदार उत्तर
मृत बालकांच्या पालकांसोबत घातला वाद, व्हिडिओ होतोय व्हायरल
मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या सावित्रीबाई फुले प्रसूतिगृहाच्या एन आय सी यु युनिट मध्ये उपचार घेत असलेल्या चार बालकांचा मृत्यू झाला असल्याची धक्कादायक घटना समोर आली . गेल्या चार दिवसात चार बालकांचा मृत्यू झाल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे . या मुद्द्याचे तीव्र पडसाद विधानसभेतही आज उमटले. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत तीव्र संताप व्यक्त करत कारवाईची मागणी केली.
यावर उत्तर देताना नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी उच्चस्तरीय चौकशीचे आदेश देत संबंधित वैद्यकिय अधिकाऱ्याला निलंबित करण्याची घोषणा विधानसभेत केली.एकीकडे शिवसेनेचे मंत्री कारवाईचं आश्वासन देत असताना दुसरीकडे या प्रकरणावर शिवसेनेच्या नगरसेविकेनं केलेल्या वक्तव्यावरुन नविन वाद निर्माण झाला आहे.
भांडूपच्या सावित्रीबाई फुले प्रसुती रुग्णालयात चार बालकांचा मृत्यू झाल्यानंतर, मुंबई महापालिका आरोग्य समिती अध्यक्षा राजूल पटेल यांनी तिथं भेट दिली. त्यावेळी रुग्णालयाबाहेर ठिय्या देऊन बसलेल्या पीडित पालकांसोबत राजूल पटेल यांचा वाद झाला.
पीडित पालकांचा संताप
आम्ही तुम्हाला निवडून दिलं आहे, जबाबदारी तुम्हालाच घ्यायला हवी, असं पीडित पालकांनी सुनावलं, यावर राजूल पटेल पालकांवरच वैतागल्या. तुमच्या मुलांना रुग्णालयात दाखल करताना आम्हाला विचारलं होतं का? असं आक्षेपार्ह वक्तव्य पटेल यांनी केलं. त्यांच्या या बेजबाबदार उत्तरानं पालक आणखीच संतापले. राजूल पटेल आणि दोषी पालिका अधिकाऱ्यांचं निलंबन करावं, अशी मागणी पालकांनी यावेळी केली.
महापौरांच्या दालनाबाहेर निदर्शनं
त्याआधी या प्रकरणाचा निषेध करण्यासाठी भाजपा नगरसेवकांनी महापौर कार्यालयाबाहेर जोरदार निदर्शनं केली. यावेळी पालिकेतील सत्ताधारी आणि प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. तसेच दोषींवर कारवाई करण्याची मागणी भाजपा गटनेते प्रभाकर शिंदे यांनी केली आहे.