कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई : देशातली सर्वात श्रीमंत महापालिका म्हणून जिचा उल्लेख होतो, त्या मुंबई महापालिकेच्या उत्पन्नामध्ये प्रचंड घट झालीय. उत्पन्न कमी आणि खर्च जास्त होत असल्यानं पालिकेचं बजेट कोलमडण्याची चिन्हे निर्माण झालीयत. खर्च कमी करून उत्पन्नाचे नवे मार्ग शोधण्याची वेळ पालिकेवर आली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

देशातील अनेक छोट्या राज्यांपेक्षा अधिक म्हणजे ३० हजार कोटी रुपयांहून अधिक बजेट असलेल्या मुंबई महापालिकेच्या उत्पन्नाला आता घरघर लागलीय.  २०१९-२० या आर्थिक वर्षात २५,५१३ कोटी रुपये उत्पन्नाचं लक्ष्य होतं. नोव्हेंबरअखेर पर्यंत यापेक्षा निम्मं म्हणजे १२,९३० कोटी रुपयांचे उत्पन्न मिळालं. रियल इस्टेट क्षेत्रातून विकास शुल्क आणि फंजिबल एफएसआय़च्या माध्यमातून ३,४५४ कोटी रुपये उत्पन्न मिळवण्याचे लक्ष्य असताना या क्षेत्रातल्या मंदीमुळं १,८३५ कोटी रुपये मिळालेत. मालमत्ता कराच्या माध्यमातून ५,०१६ कोटी रुपयांचे लक्ष्य असताना १३८७ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळालं आहे.


दुसरीकडं खर्चात मात्र वाढ होते आहे. कर्मचाऱ्यांना वेतनापोटी दिली जाणारी रक्कम १७ हजार कोटींवरून १९ हजार कोटी रुपयांवर गेलीय. तसंच अडचणीत सापडलेल्या बेस्ट प्राधिकरणाला सुमारे २ हजार कोटी रुपयांची मदत देण्यात आलीय. मुंबई महापालिकेकडं ७० हजार कोटी रुपयांच्या ठेवी असल्या तरी त्या कोस्टल रोड, गारगाई-पिंजाळ प्रकल्प, गोरेगाव-मुलुंड लिंक रोड, एसटीपी प्रकल्प बांधणीसाठी लागणार आहेत.


उत्पन्न कमी झाल्याचे मान्य करत ठेवी मोडण्यापेक्षा उत्पन्नाचे नवे मार्ग शोधण्यावर भर असल्याचे महापौरांनी सांगितले. तर पालिकेचे उत्पन्न कमी होण्यास प्रशासनाचे धोरण जबाबदार असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. राज्यातही आता शिवसेनेचाच मुख्यमंत्री असल्यानं पालिकेला राज्य सरकारकडून मोठ्या मदतीची अपेक्षा आहे.