मुंबई : कंगना राणौत आणि शिवसेना हा वाद आता शिगेला पोहोचला आहे. मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी करुन कंगनाने हा वाद ओढवून घेतला. त्यानंतर तिने मुंबई पोलिसांवर अविश्वास दाखवला. तसेच ९ तारखेला मुंबईत येऊन दाखवणार कोणाच्या बापात हिम्मत असेल तर अडवा असे खुले आव्हान देखील तिने दिले. दरम्यान केंद्राने तिला वाय दर्जाची सुरक्षा देऊ केली आहे. या पार्श्वभुमीवर आता पालिकेचे अधिकारी कंगनाच्या घराची पाहणी करत आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कंगना राणावत हिच्या पाली हिल परिसरात असणाऱ्या कार्यालयाची बीएमसी अधिकाऱ्यांकडून पाहणी सुरु आहे. हे कार्यालय बीएमसी नियमाप्रमाणे बांधलेला आहे का याची त्यांनी पाहणी केली. गेले अनेक दिवस कंगना राणावत ने मुंबईवर तसंच महाराष्ट्र पोलीस दल यांच्यावर ट्विटर मार्फत टीका करत आहे.


या पार्श्वभूमीवर कंगना राणावतचे ऑफिस कायदेशीररित्या आहे का ? याची बीएमसी अधिकारी पाहणी करत आहेत. 


इमारत प्रस्ताव विभागाकडं असलेल्या प्लॅननुसार ऑफिस आहे ? की त्यात अंतर्गत बदल केले आहेत ? एफएसआय उल्लंघन केले आहे का ? याची पाहणी केली जात आहे. यात उल्लंघन आढळल्यास कंगनाला एमआरटीपी नोटीस दिली जावू शकते. त्यामुळे कंगना सोबतचे वाद अधिक चिघळण्याची चिन्हं दिसत आहेत. 


शिवरायांच्या महाराष्ट्राची बदनामी कोणी अशी करत असेल तर हा शिवसेनेचा एकट्याचा विषय नाही, हा संपूर्ण राज्याचा प्रश्न आहे, असे संजय राऊत म्हणाले. भाजपने कंगनाशी असहमती दाखवली असली तरी त्यांनी खोलात जाऊन ही भूमिका मांडली पाहिजे, असे ते म्हणाले. कंगनानं स्वतःचे ट्विटर हँडल स्वतः वापरावे, असा सल्ला त्यांनी दिला. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी कंगनाला योग्य ते सुनावले आहे. राज्य सरकार तिच्याबद्दल काय तो निर्णय घेईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले. 



कंगनाचा सूर बदलला 


कंगनाच्या मुंबईच्या वक्तव्यावरून वातावरण पेटले आहे. यावरून कंगनाला मुंबईत न येणाचा सल्ला देणाऱ्यांना कंगनाने  आव्हान दिले होते. कुणाच्या बापात हिम्मत असेल तर मला रोखून दाखवा, असे म्हणत कंगनाने आपण ९ सप्टेंबर रोजी मुंबईत येणार असल्याचं सांगितलं आहे. त्यानंतर आता कंगनाने नरमाईची भूमिका घेत जय मुंबई, जय महाराष्ट्र म्हटले आहे.


कंगनाला मुंबई पोलिसांची भीती वाटत असेल तर तिने आपल्या राज्यात निघून जावे, असा इशारा शिवसेना, मनसेने दिला होता. तर, कंगनाला मुंबईत राहण्याचा अधिकार नाही, असे मत खुद्द राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी व्यक्त केले होते. तसेच भाजपनेही कंगनाला पाठिंबा देण्याबाबत यू टर्न घेतला होता. तसेच सिनेक्षेत्रातील मंडळींनीही कंगनाला मुंबई आणि महाराष्ट्राबद्द कृतज्ञता बाळगण्याचा सल्ला दिला होता. अनेक सेलिब्रिटींनी थेट तिच्यावर टीका न करता 'मुंबई मेरी जान' म्हणत कंगनाला अप्रत्यक्ष टोकले होते.


'जर त्या मुलीनं (कंगनानं) महाराष्ट्राची माफी मागितली तर तिला माफ करण्याचा विचार केला जाईल. तिनं मुंबईला मिनी पाकिस्तान म्हटलं, अहमदाबादविषयी असंच बरळण्याचं धाडस तिच्यात आहे का?' असे राऊत म्हणाले.