दीपक भातुसे, मुंबई : दारू खरेदीसाठी लोकांची होणारी गर्दी, त्यातून लॉकडाऊनच्या नियमांचे होणारे उल्लंघन लक्षात घेता मुंबई महापालिकेने लॉकडाऊनमध्ये दिलेली शिथिलता आज अखेर रद्द केली आहे. 3 एप्रिलपासून लॉकडाऊनमध्ये राज्य सरकारने शिथिलता दिली होती. त्यानुसार अत्यावश्यक सेवेच्या दुकानांव्यतिरिक्त इतर दुकानं सुरू करण्याची परवानगी सरकारने दिली होती. दारूच्या दुकानांनाही परवानगी देण्यात आली होती. मात्र दारू खरेदी करण्यासाठी मुंबईत अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याचं दोन दिवस पहायला मिळालं. अनेक ठिकाणी तर काही किलोमीटरची रांग लागली होती. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मद्यप्रेमींकडून रांगेत कोणत्याही नियमांचं पालन होत नव्हतं. दारू खरेदी करण्यासाठी लोक अक्षरशः एकमेकांवर अनेक ठिकाणी तूटन पडलेले पहायला मिळाले. दारूची दुकानं सुरू करताना दुकानासमोर एकावेळी पाचच ग्राहक उभे राहतील अशी अट घालण्यात आली होती. तर प्रत्येक ग्राहकामध्ये सहा फुटांचे अंतर ठेवण्याची अटही ठेवण्यात आली होती. मात्र अनेक दुकानांसमोर शेकडोने ग्राहकांनी गर्दी केल्याचं दिसून आलं. तर सहा फुटाचं अंतराचे नियमाचेही बहुतेक ठिकाणी उल्लंघन केल्याचं पहायला मिळालं. यातून कोरोनाचा फैलावच होण्याची भीती होती. त्यामुळे मुंबई महापालिकेने लॉकडाऊनची शिथिलता अखेर आज रद्द केली आहे.


मुंबईतच नाही तर राज्यात आणि देशात देखील असंच काहीसं चित्र होतं. वाईन शॉप बाहेर लांबच लांब रांगा लागल्या होत्या.