दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई: कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर मुंबईच्या सर्व खासगी रुग्णालयांतील ८० टक्के खाटा महापालिकेने ताब्यात घेतल्याची माहिती राज्याचे मंत्री जयंत पाटील यांनी दिली. ते बुधवारी मुंबईत झालेल्या पत्रकारपरिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी म्हटले की, कोरोनाच्या काळात आम्हाला सहकार्याची अपेक्षा आहे. राज्य सरकार खूप काही करत आहे. पण ते लोकांपर्यंत पोहोचत नसल्याने काहीजण सरकारवर टीका करत असल्याचे जयंत पाटील यांनी सांगितले. 

COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई महानगरपालिकेने रुग्णालयांच्या माहितीसाठी एक डॅशबोर्ड तयार केले आहे. या डॅशबोर्डवरून लोकांना रुग्णालयात किती खाटा रिक्त आहेत, याची माहिती मिळेल. तसेच खासगी रुग्णालयांतील ८० टक्के खाटा महापालिकेने ताब्यात घेतल्या आहेत. त्यामुळे नागरिकांना सरकारी रुग्णालयाच्या खर्चातच खासगी रुग्णालयात उपचार मिळतील. 

१९१६ या कंट्रोल रुमच्या नंबरवर फोन केला तर तुम्हाला कोणत्या रुग्णालयात जायचे याची माहिती मिळेल. याशिवाय, रुग्णवाहिकांची संख्याही वाढवण्यात आली आहे. तसेच वेळ पडल्यास आणखी २०० सुमो आणि बेस्टच्या ५० बसेस उपलब्ध करुन देण्यात आल्याचीही माहिती जयंत पाटील यांनी दिली. 

जयंत पाटील यांच्या पत्रकारपरिषदेतील ठळक मुद्दे


* मुंबईत बीकेसीला जसे १००० बेडचे रुग्णालय उभं केलं आहे, तशी आणखी तीन ते चार रुग्णालये उभी केली जातील.
* डायलिसीससाठी विशेष व्यवस्था महापालिकेने केली आहे
* आतापर्यंत राज्य सरकारने मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून ७५ कोटी रुपये रेल्वेला या मजुरांच्या तिकीटासाठी दिले आहेत.
* राज्य सरकारने रस्त्याने चालत जाणाऱ्या मजुरांना मोफत एसटीने राज्याच्या सीमेवर पोहचवले.
* पश्चिम रेल्वेकडून ५५ गाड्या आज सुटणार आहेत. यापैकी १८ गाड्या महाराष्ट्र आणि ३७ गाड्या गुजरातच्या वाट्याला आल्या आहेत.महाराष्ट्रातून बाहेर जाणार्‍यांची संख्या जास्त असताना आपल्याला गाड्या कमी दिल्या आहेत.