महत्त्वाची बातमी : कोरोनाचा प्रतिबंध करण्यासाठी महापालिका देणार HCQ गोळ्या
येत्या काळात, २-३ दिवसांत....
कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई : Coronavirus चा वाढता प्रादुर्भाव पाहता आता या परिस्थितीशी लढा देण्यासाठी म्हणून सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्णसंख्या असणाऱ्या मुंबईत एक महत्त्वाचं पाऊल उचलण्यात येणार आहे. कोरोना व्हायरसचा प्रतिबंध करण्यासाठी मुंबई महापालिकेकडून हायड्रॉक्सिक्लोरोक्वीनच्या (HCQ) गोळ्या देण्याचं ठरवण्यात आलं आहे.
सुरूवातीच्या टप्प्यात धारावी आणि वरळी भागातील ५० हजार नागरिकांना या गोळ्या दिल्या जाणार आहेत. कंटेनमेंट झोनमधील परिसरात राहणाऱ्या १८ ते ५५ वयोगटातील आणि मोठा आजार नसलेल्यांना ८ गोळ्यांचा डोस दिला जाणार आहे.
येत्या काळात, २-३ दिवसांत कंटेनमेंट झोनमधील नागरिकांमध्ये पालिकेतर्फे गोळ्या देण्यास सुरूवात करण्यात येणार आहे. पहिल्या दिवशी दोन गोळ्या (८०० मिली ग्रॅम ) घेतल्यानंतर प्रत्येक आठवड्याला एक गोळी ( ४०० मिली ग्रॅम) याप्रमाणे ६ गोळ्या दिल्या जाणार आहेत.
सध्या कोरोना रूग्णांवर उपचार करणारे डॉक्टर, नर्सेस आणि इतर स्टाफ या गोळ्या घेत आहेत. हायड्रॉक्सिक्लोरोक्वीनचा डोस घेतल्यामुळं कोरोना व्हायरसचा काही प्रमाणात प्रतिबंध होतो, असं मानलं जात असल्यानं याचा वापर आता कोरोनाचे हॉटस्पॉट ठरलेल्या वरळी आणि धारावीत केला जाणार आहे.
वृद्ध आणि इतर मोठे आजार असलेल्या व्यक्तींना मात्र या गोळ्या दिल्या जाणार नाहीत. सध्या मुंबई महापालिकेकडं अशा साडेदहा लाख गोळ्यांचा साठा आहे. त्यामुळे आता हे अत्यंत मोठं पाऊल उचलून कोरोनला नियंत्रणाल आणण्यासाठी पालिकेने कंबर कसली आहे.