मुंबई : रस्त्यावर ठिकठिकाणी ओसंडून वाहणाऱ्या कचराकुंडया आणि सभोवताली घाणीचं साम्राज्य भारताची आर्थिक राजधानी मुंबईत सर्रास पाहायला मिळतं. परंतू लवकरच हे चित्र बदलणार आहे. कारण मुंबई महापालिकेनं प्रायोगिक तत्वावर चक्क जमिनीखाली कचराकुंड्या बसवण्यास सुरूवात केली आहे. हे मोठे कचऱ्याचे डबे जमिनीच्या आत बसवलेले असणार आहेत. जमिनीवर केवळ कचरा टाकण्यासाठीची चौकोनी जागा ठेवण्यात आली आहे. वरून टाकलेला कचरा जमिनीखालच्या डब्यात जाणार असल्यानं तो नजरेस पडणार नाही. आणि घाणीचं साम्राज्यही दिसणार नाही. सुरूवातीला सुमारे ३६ लाख रुपये खर्च करून महापालिकेच्या ए आणि डी अशा वॉर्डात प्रत्येकी दोन ठिकाणी असे भूमीगत कचरापेट्या बसवल्या आहेत. गिरगाव चौपाटीवर देखील अशी कचराकुंडी बसवण्यात आली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबईतून दररोज १०,००० हजार मेट्रिक टनपेक्षाही अधिकचा कचरा जमा होतो. या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी पालिकेला तीन डम्पिंग ग्राउंडही कमी पडतात. या कचऱ्याची रोज शास्त्रयुक्त पद्धतीने विल्हेवाट लावणे हे महापालिकेसमोर मोठे आव्हान आहे. मुंबईमधील लोकसंख्या पाहता मुंबईत कचऱ्याचं प्रमाण देखील वाढत आहे. कचरा टाकण्याच्या बाबतीत अजूनही लोकांमध्ये जागृकता आणण्याची गरज आहे. शहरातील कचरा साफ करण्यासाठी आणि कचरा उचलून नेण्यासाठी लाखो रुपये खर्च होतात. शिवाय कचऱ्याचा ढीग साचल्याने त्याचे आरोग्यावरही परिणाम होतात. यावर तोडगा काढण्यासाठी महापालिका प्रशासन वेगवेगळा फंडा वापरत आहे. 


मुंबईत कचऱ्याची समस्या बिकट आहे. कचरा रस्त्यावर टाकण्यात झोपडपट्टीतील अशिक्षि, कोटय़वधी रुपयांच्या बंगल्यात राहणारे यापासून टॉवरमध्ये राहणारे लोकं देखील जबाबदार आहेत. मुंबई शहर कचरामुक्त होण्यासाठी आणि खऱ्या अर्थाने सुंदर आणि स्वच्छ मुंबई होण्यासाठी पालिकेने आणलेल्या या नव्या कचराकुंड्यांचा योग्य पद्धतीने नागरिकांनी वापर करणं गरजेचे आहे.