600+ जणांना एकाच वेळी मुंबईच्या समुद्रात मिळालेली जलसमाधी; `रामदास` बोटीबरोबर नक्की घडलेलं तरी काय?
Ramdas Ship Tragedy: मुंबईत गेटवे ऑफ इंडिया येथे बोट दुर्घटनेत 13 जणांना प्राण गमवावे लागले. या अपघातानंतर रामदास बोट दुर्घटनेच्या आठवणी ताज्या झाल्या आहेत.
Ramdas Ship Tragedy: मुंबई येथील गेटवे ऑफ इंडियायेथून एलिफंटाकडे जाताना बोट उलटून झालेल्या दुर्घटनेत आत्तापर्यंत 13 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. 78 वर्षांपूर्वीदेखील मुंबईत अशीच किंबहुन यापेक्षा भयानक दुर्घटना घडली होती. 78 वर्षांपूर्वी मुंबईच्या भाऊच्या धक्क्याकडून रेवस येथे जाण्यासाठी निघालेल्या एमएस रामदास या बोटीला जलसमाधी मिळाली होती. या दुर्घटनेत 600 पेक्षा जास्त जणांचा बुडून मृत्यू झाला होता.
1947 साली भारत स्वातंत्र्य होण्याआधीच महाराष्ट्रावर मोठा आघात झाला होता. 17 जुलै 1947 साली गटारी अमावस्येचा दिवस होता. सकाळी 8 वाजता मुंबईच्या भाऊच्या धक्क्याकडून रेवस येथे जाण्यासाठी एमएस रामदास निघाली खरी मात्र त्याआधीच बोटीला जलसमाधी मिळाली. मुंबई बंदरापासून 7.5 किमी अंतर बोटीने कापले होते त्याचवेळी मुसळधार पाऊस सुरू झाला. बोट वेगाने पुढे जात होती त्याचवेळी सोसाट्याचा वारा आणि उसळलेल्या लाटांमुळं बोट काशाच्या खडकांजवळ कलली.
बोट खडकाजवळ उलटल्यानंतर हळूहळू बोटीत पाणी भरू लागले. बोटीत पाणी शिरत असल्याचे पाहून प्रवासी सैरावरा पळू लागले. जीव वाचवण्यासाठी प्रत्येकजण धडपडू लागला. लाइफ जॅकेटची संख्याही कमी होती. त्याचवेळी रामदास जहाज गल्स दीपजवळ पोहोचले आणि त्याचवेळी आलेल्या महाकाय लाटेने जहाज पाण्यात कलंडले आणि पाणी जहाजात पूर्णपणे शिरले. ज्या प्रवाशांनी पोहता येत होती त्यांनी पटापट समुद्रात उडी घेत जीव वाचवला तर काही जण अडकून पडले. सकाळी 9च्या सुमारास संपूर्ण जहाजाला जलसमाधी मिळाली.
साधारणतः मुंबईहून रेवासला पोहोचण्यासाठी 1.30 तासांचा अवधी लागतो. मात्र, जहाज बुडाल्याची माहिती संध्याकाळी 5पर्यंत कोणालाही नव्हती. बारक्या मुकादम या 10 वर्षांच्या मुलाने लाटा झेलत कसाबसा मुंबईचा किनारा गाठला तेव्हा मुंबईत या दुर्घटनेची माहिती मिळाली. त्यानंतर कंपनीने दोन बोटी प्रवाशांच्या मदतीसाठी पाठवल्या होत्या. मात्र तोपर्यंत सर्व संपलं होतं. 630 जणांना जलसमाधी मिळाली होती तर 60 ते 70 जणांचा जीव वाचला होता.
रेवस येथील कोळीबांधवानी 20 ते 25 जणांना वाचवून किनाऱ्यावर आणले होते. कोळीबांधवानी हजारो रुपयांची मासळी समुद्रात फेकून बुडणाऱ्या प्रवाशांना वाचवून रेवस बंदरावर पोहोचवले. बोटीचा कॅप्टन यासह बरेच खलाशी यांचाही जीव वाचला होता. बुडालेल्या रामदास बोटीचे काही अवशेष अपघातानंतर सुमारे दहा वर्षांनी म्हणजे 1957 मध्ये मुंबईतील बेलॉर्ड पिअरच्या समुद्रकिनार्यावर वाहात आले होते.