कुत्र्याला अमानवी मारहाण करणाऱ्यांविरोधात सोनम आक्रमक
तिने या प्रकरणी तीव्र संताप व्यक्त केला
मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर हिने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटच्या माध्यमातून एक हृदय हेलावणारी पोस्ट करत अनेकांचं लक्ष वेधलं. पावसापासून आसरा घेण्यासाठी म्हणून एक भटका कुत्रा वरळी येथील एका वसाहतीच्या आवारात आला असता त्याला बेदम मारहाण करण्यात आली. या घृणास्पद कृत्याविषयी सोनमने तीव्र शब्दांत संताप व्यक्त केला.
प्राण्यांच्या हक्कांसाठी कायम पुढाकार घेणाऱ्या सोनमने सोशल मीडिया अकाऊंटच्या माध्यमातून असह्य वेदनांमध्ये विव्हळणाऱ्या कुत्र्याला मदत करावी असं आवाहन केलं. 'एएनआय' या वृत्तसंस्थेने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार २४ जुलै रोजी ही घटना घडली. ज्यावेळी मुंबईच्या वरळी येथील नेहरु तारांगण परिसरात असणाऱ्या टर्फ व्ह्यू इमारतीतील भाटीया नामक रहिवासी यांनी तेथील सुरक्षा रक्षकाला त्या कुत्र्याला मारण्याचा इशारा दिला होता. जेणेकरुन पुढे जाऊन कोणताही प्राणी इमारतीच्या परिसरात येणार नाही.
आपल्याला सांगण्यात आल्यानुसार त्या सुरक्षा रक्षकाने कुत्र्याला अमानुष मारहाण केली. सोशल मीडियावर याविषयीचा एक व्हिडिओसुद्धा व्हायरल झाला. ज्यानंतर बॉम्बे ऍनिमल राईट्स संस्थेतर्फे २७ जुलै रोजी, एफआयआर दाखल करण्यात आली. ज्यामध्ये भाटीया आणि संबंधित सुरक्षा रक्षकाच्या नावे तक्रार दाखल करण्यात आली.
भारतीय दंडसंविधानाच्या कलम ४२९ आणि ३४ अंतर्गत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. पण, लगेचच त्यांची सुटकाही झाली. या कारवाईनंतर बॉम्बे ऍनिमल राईट्स संस्थेने प्राणीप्रेमींना या इमारतीपाशी एकत्र येत प्राणीमात्रांच्या या छळाविरोधात आवाज उठवण्याटी मागणी केली. फक्त सोनमच नव्हे, तर अभिनेता जॉन अब्राहम आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांनीही या घटनेचा विरोध केला.