उद्धव ठाकरेंच्या शपथविधीसाठी शिवतीर्थावर नितीन देसाई उभारणार भव्य सेट
हा सेट मराठी संस्कृतीची झलक दाखवणारा असेल.
मुंबई: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे गुरुवारी संध्याकाळी शिवतीर्थावर मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. यासाठी शिवसेनेकडून जय्यत तयारी सुरु आहे. उद्धव यांचा शपथविधी सोहळा डोळ्यांचे पारणे फेडणारा असावा, अशी शिवसेनेची इच्छा आहे. त्यासाठी सुप्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन देसाई यांच्यावर खास सेट उभारण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. अवघ्या २४ तासांमध्ये हा सेट उभारणे हे मोठे आव्हान आहे. मात्र, नितीन देसाई यांची ख्याती पाहता ते ही कामगिरी सहज पार पाडतील, असा विश्वास शिवसेनेला आहे.
ठाकरे, शिवसेना, शिवतीर्थ या समीकरणातला आणखी एक विजयी क्षण
नितीन देसाई यांनीही उद्धव ठाकरे यांच्या शपथविधीसाठी सेट तयार करायला मिळणे, हा आपल्यासाठी भाग्याचा क्षण असल्याची भावना व्यक्त केली. हा सेट मराठी संस्कृतीची झलक दाखवणारा असेल, असेही नितीन देसाई यांनी सांगितले.
ठरलं.. शिवसेनेला १५, राष्ट्रवादीला १३ मंत्रिपदं तर काँग्रेसला विधानसभेचं अध्यक्षपद
शिवतीर्थावर उद्या संध्याकाळी ६ वाजून ४० मिनिटांच्या मुहूर्तावर हा शपथविधी पार पडेल. शिवाजी पार्कात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोरच हे व्यासपीठ तयार केले जात आहे. याच जागेवर दरवर्षी शिवसेनेचा ऐतिहासिक दसरा मेळावाही होत असतो. त्यासाठी सहा हजार फुटांचे भव्य व्यासपीठ उभारले जाईल. मंचावर शंभर जणांना बसण्यासाठी आसन व्यवस्था केली जाईल. तसेच कार्यकर्त्यांना बसण्यासाठी तब्बल ७० हजार खुर्च्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. याशिवाय, शपथविधी सोहळ्याचं लाईव्ह टेलिकास्ट पाहण्यासाठी शिवाजी पार्कमध्ये कानाकोपऱ्यात २० एलईडी लावले जाणार आहेत.
देशातील प्रमुख नेत्यांना या शपथविधी सोहळ्याचे निमंत्रण देण्यात आले आहे.
१. राज ठाकरे, मनसे
२, ममता बॅनर्जी, मुख्यमंत्री, बंगाल
३. अरविंद केजरीवाल, मुख्यमंत्री, दिल्ली
४. चंद्रबाबू नायडू, टीडीपी अध्यक्ष, माजी मुख्यमंत्री
५. अशोक गहलोत, मुख्यमंत्री, राजस्थान
६. अखिलेश यादव, माजी मुख्यमंत्री, उत्तर प्रदेश
७. एचडी देवेगौडा, माजी पंतप्रधान, जेडीएस अध्यक्ष
८. सोनिया गांधी, काँग्रेस अध्यक्ष