मुंबई : पुन्हा एकदा सेल्फी काढण्याच्या जीव गमविण्याची वेळ तरुणावर आलेय. सेल्फी घेण्याच्या नादात २० वर्षीय तरुणाने शनिवारी दुपारी मरिन ड्राइव्ह किनाऱ्यावर जीव गमावला. किनाऱ्याच्या कठड्याखालील दगडांमध्ये उतरून मित्रासोबत सेल्फी घेताना हा तरूण घसरला आणि ओहोटीच्या लाटांत सापडून समुद्रात बुडाला. दरम्यान, त्याला वाचविण्यासाठी समुद्रात उडी मारणारा तरुण जखमी झाला. तर दुसरीकडे मित्र बुडत असताना त्याच्यासोबतचा मित्र तेथून पळून गेला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या अपघातानंतर मरिन ड्राइव्ह पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शनिवारी संध्याकाळी मरिन ड्राइव्ह ते गिरगाव चौपाटीपर्यंत तब्बल एक लाखांहून अधिक पर्यटक जमले होते. दर पावसाळ्यतल्या सुटीच्या दिवशी येथे असेच चित्र असते. शनिवारी दुपारी मरिन ड्राइव्हवर आलेले दोन तरूण त्या दगडांवर उतरले. तेथे उतरून ते सेल्फी घेत होते. इतक्यात एकाचा पाय सरकला आणि तो समुद्रात पडला. पोहोता येत नसल्याने तो बुडू लागला. त्याला वाचविण्यासाठी पर्यटकांमधील एक तरूण खाली उतरला. मात्र तोही जखमी झाला.



 दरम्यान, बुडालेल्या तरुणाला २० मिनिटांनंतर बाहेर काढण्यात यश आले. त्याला तातडीने जीटी रुग्णालयात दाखल केले गेले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.