मुंबई : कोरोना व्हायरसशी लढण्यासाठी निर्णय प्रक्रिया जिथून राबवली जात आहे, त्या मंत्रालयात आता दर २० मिनिटांनी निर्जंतुकीकरण केलं जात आहे. लोकांच्या हाताचा जिथे-जिथे स्पर्श होतो, तिथे निर्जंतुकीकरण केलं जात आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्यमंत्री राजेश टोपे वेळोवेळी जिल्हाधिकाऱ्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संपर्क साधून राज्यातील स्थितीचा आढावा घेत आहेत. कोरोनाशी लढण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना सरकार करत आहे. राज्यभरात उपाययोजना करतानाच मंत्रालयातही प्रवेशावर निर्बंध घालण्यात आले आहेत. त्यातच आणखी एक महत्वपूर्ण माहिती उघड झाल्यानं प्रशासन खडबडून जागं झालं आणि अधिक खबरदारी घेण्यास सुरुवात झाली.


मंत्रालयातील सार्वजनिक बांधकाम विभागातील एका अधिकाऱ्याच्या भावाला कोरोनाची लागण झाल्याचं लक्षात आल्यानंतर प्रशासनानं अधिक खबरदारी घेत निर्जंतुकीकरण करण्यास सुरुवात केली आहे. संबंधित अधिकाऱ्याचीही कोरोना चाचणी करण्यात आली असून त्याचा अहवाल अजून प्रलंबित आहे.


असं होतं निर्जंतुकीकरण


मंत्रालयात आता दर २० मिनिटांनी निर्जंतुकीकरण केलं जात आहे. लोकांच्या हाताचा स्पर्श होणाऱ्या ठिकाणी म्हणजे हॅण्डरेल, लिफ्टची बटणं, एक्सलेटर, दारवाजाचे हँण्डल अशा ठिकाणी निर्जंतुकीकरण केले जात आहे.


दरम्यान, राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे आज पुन्हा राज्यभरातील कोरोना स्थितीचा आढावा घेणार आहेत. सह्याद्री अतिथीगृहात राज्यातील आरोग्य सचिवांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत आरोग्यमंत्री टोपे बैठक घेऊन आढावा घेणार आहेत. राज्यात  कोरोनाचे ३९ रुग्ण असून गेल्या २४ तासांत नवा रुग्ण आढळला नसल्याची माहिती प्रशासनानं दिली आहे.