मुंबई : रेमडेसिवीर इंजेक्शनचा 60 हजार वायलचा साठा असल्याच्या संशयातून ब्रुक फार्मा कंपनीच्या मालकाला रात्री उशीरा बीकेसी पोलिसांनी चौकशीसाठी बोलावले. यामुळे बीकेसी पोलिस ठाण्यात थेट राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर, भाजपनेते प्रसाद लाडदेखील तेथे पोहचले. राज्याला रेमडेसिवीर देऊ करणाऱ्या फार्मा कंपन्यांना ठाकरे सरकार त्रास देत असल्याचा घणाघाती आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज्यातील वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर रुग्णांना रेमडेसिवीर इंजेक्शनची गरज भासत आहे. परंतु वाढत्या रुग्णसंख्येमुळे राज्यात रेमडेसिवीरचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे महाराष्ट्र भाजपकडून राज्याला 50 हजार रेमडेसिवीर इंजेक्शन उपलब्ध करून देऊ असं विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी काही दिवसांपूर्वी म्हटले होते.



दमन येथील ब्रुक फार्मा कंपनीकडे रेमडेसिवीरचे इंजेक्शन होते. त्यांच्याशी दरेकर यांनी संपर्क साधून महाराष्ट्रासाठी इंजेक्शन देण्याची विनंती केली होती. परंतु कंपनीकडे आवश्यक परवानग्या नसल्यामुळे त्यांनी इंजेक्शन देण्यास असमर्थता दर्शवली होती. 


देवेंद्र फडणवीस यांनी केंद्र सरकारच्या विविध विभागांशी संपर्क साधून या कंपनीला आवश्यक परवानग्या मिळवून दिल्या. त्यानंतर राज्य सरकारच्या आवश्यक परवानग्या घेतल्या. आता कंपनी इंजेक्शन पुरवण्यास सज्ज होती. .


शनिवारी रात्री अचानक ब्रुक फार्माच्या मालकाला बीकेसी पोलिसांनी चौकशीसाठी बोलावले. ही माहिती मिळताच देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड हे भाजपनेते तेथे पोहचले. 


संबधित कंपनीने 60 रेमडेसिवीरचा साठा केल्याची माहिती पोलिसांना प्राप्त झाली होती. म्हणून त्यांना विचारपूस करण्यासाठी बोलवण्यात आल्याची माहिती पोलिसांनी भाजपनेत्यांना दिली. चौकशीनंतर ब्रुक कंपनीच्या मालकाला सोडून देण्यात आले.



दरम्यान, राज्यातील गरजू रुग्णांसाठी जी फार्मा कंपनी रेमडेसिवीर देण्यास तयार होती. तिला राज्य सरकारडून त्रास दिला जात आहे. राज्याच्या मंत्र्यांकडून आपत्कालातही राजकारण सुरू आहे. मंत्र्याच्या PA कडून त्यांना धमक्या दिल्या जात आहे. असा घणाघाती आरोप फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना केला.