मुंबई : सर्वात मोठे बजेट भाषण होते. दूरदृष्टीचा अभाव दिसून येत आहे. हे दिशाहीन बजेट होते, अशी खोचक टीका राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्रीय अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया देताना केली. रोजगार निर्मिती आणि विकासासाठी ठोस काहीच नाही. बेरोजगारीच्या प्रश्नाकडे योग्यप्रकारे लक्ष दिले गेलेले नाही. हे सर्वात लांब भाषण होते. परंतु त्यामध्ये दूरदृष्टी आणि दिशा देण्याचा अभाव होता. तर ऑटोमोबाईल क्षेत्राकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले गेले आहे. या अर्थसंकल्पात कृषी गोदामांवर लक्ष केंद्रित केले आहे. परंतु दुप्पट शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर दूरदृष्टी आणि स्पष्टतेचा अभाव आहे. हे अजूनही एक दूरचे स्वप्न दाखविण्यात आले आहे, असे पवार म्हणालेत.



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्याआधी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनीही टीका केली आहे. निराशाजनक आणि गोंधळात टाकणारे बजेट सादर केले आहे, असे राहुल गांधी म्हणालेत. महाराष्ट्र आणि मुंबईची घोर निराशा झाल्याची राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरातांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. बजेटमध्ये जनतेची फसवणूक केल्याची प्रतिक्रिया सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी दिली. 


तर भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, माजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या बजेटचे कौतुक केले आहे. यंदाचा केंद्रीय बजेट हा उत्पादकता आणि रोजगार वाढवणारा असल्याची प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिलीय. तर पायाभूत सुविधांमध्ये मोठी गुंतवणूक करणार असल्यामुळे रोजगार वाढीसाठी मदत होणार असल्याचं केंद्रीय रस्तेवाहतूक मंत्री नितीन गंडकरींनी सांगितले. 


अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी मांडलेल्या बजेटमध्ये शेती आणि ग्रामीण भागावर अधिक लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. पाणी योजना, सौरऊर्जेसाठी आर्थिक तरतूद करण्यात आली आहे. सर्वसामान्य करदात्यांसाठी आता दोन पर्याय उपलब्ध असणार आहेत. कोणतीही सवलत घेतली नाही, तर कमी टक्के दराने कर भरावा लागेल. LIC या देशातील सर्वात मोठ्या विमा कंपनीच्या IPOची घोषणाही अर्थमंत्र्यांनी केली. हे आतापर्यंतचं सर्वात मोठं अर्थसंकल्पीय भाषण ठरले आहे. तब्बल २ तास ४० मिनिटं सीतारमण बोलत होत्या. त्यांनी अंतरीम अर्थसंकल्पातील स्वतःचाच दोन तास १७ मिनिटांचा रेकॉर्ड मोडला आहे. विशेष म्हणजे अचानक अस्वस्थ वाटू लागल्यामुळे त्यांनी शेवटची दोन पाने त्यांनी वाचलीच नाहीत. अन्यथा हे भाषण आणखी लांबलं असते.