सिंचन गैरव्यवहारातील बिल्डरने डोक्यात गोळी झाडून केली आत्महत्या
गोसीखुर्द जलसिंचन गैरव्यवहारातील संशयित आरोपी आणि बिल्डर जिगर ठक्कर याने आत्महत्या केली. मरीन ड्राइव्ह येथे गाडीतच रिव्हॉल्व्हरने त्याने डोक्यात गोळी झाडून घेतली. याप्रकरणी मरीन ड्राइव्ह पोलीस अधिक तपास करीत आहेत.
मुंबई : गोसीखुर्द जलसिंचन गैरव्यवहारातील संशयित आरोपी आणि बिल्डर जिगर ठक्कर याने आत्महत्या केली. मरीन ड्राइव्ह येथे गाडीतच रिव्हॉल्व्हरने त्याने डोक्यात गोळी झाडून घेतली. याप्रकरणी मरीन ड्राइव्ह पोलीस अधिक तपास करीत आहेत.
गाडीतच स्वत:ला गोळी घातली
जिगर ठक्कर आपल्या चालकासह कारने मंगळवारी सायंकाळी नरीमन पॉइंट येथे आला होता. नरीमन पॉइंटवर काही वेळ काढल्यानंतर जिगर सायंकाळी साडेसहाच्या सुमारास मरीन ड्राइव्ह येथे आला. समुद्रकिनारी रस्त्याच्या कडेला गाडी पार्क करुन चालकाला गाडीबाहेर उभे राहण्यास सांगितले. कारमध्येच जिगर याने आपल्या रिव्हॉल्व्हरने उजव्या बाजूने डोक्यात गोळी झाडली. अचानक आवाज झाल्याने चालकाने दरवाजा उघडला त्यावेळी जिगर रक्ताच्या थारोळ्यात दिसला. त्याला तत्काळ जी. टी. रुग्णालयात नेण्यात आले. डॉक्टरांनी तपासून जिगर याला मृत घोषित केले.
गैरव्यवहारप्रकरणी आरोपपत्र
घाटकोपर येथील जिगर ठक्कर हा रहिवासी आहे. तो बांधकाम व्यवसायात होता. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या व्यवसायामध्ये तो तोट्यात गेला होता. त्यातच गोसीखुर्द पाटबंधारे घोटाळय़ातील आरोपींमध्ये जिगर ठक्कर याचेही नाव होते. अॅण्टी करप्शन ब्युरोने जिगर तसेच त्याच्या काही नातेवाईकांवर आरोपपत्र दाखल केले होते.