मुंबई : राज्यात बैलगाडी शर्यतीचा मार्ग मोकळा  झाला आहे. बैलगाडी शर्यतसंबंधित विधेयकावर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी सही केली. त्यामुळे या विधेयकावर  शिक्कामोर्तब झालेय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज्य विधीमंडळाने बैलगाडी शर्यत विधेयक संमत केले होते. या विधेयकावर राष्ट्रपतींनी स्वाक्षरी केल्याने राज्यात बैलगाडी शर्यत पुन्हा सुरु होणार आहे.


महाराष्ट्र विधानसभेनी बैलगाडा शर्यतींच्या विधेयकाला मंजुरी दिली होती. पशुपालन मंत्री महादेव जानकर यांनी हे विधेयक विधानसभेत ठेवले होते. पशु क्रूरता प्रतिबंधक कायद्यामध्ये सुधारणा विधेयक मंजूर करण्यात आल्याने आता बैलगाडा शर्यतींचा मार्ग मोकळा झाला होता. या विधेयकात सुधारणा करण्यासाठी एक समिती नेमण्यात आली होती. 


तामिळनाडूतील जलीकट्टूच्या पार्श्वभूमीवर राज्यात बैलगाडा शर्यत पुन्हा सुरू होण्याची शक्यता होती. राज्य सरकारने बैलगाडा शर्यत सुरू कराव्या त्यासाठी लोकांनी हालचाली सुरू केल्या होत्या. तामिळनाडूतील जलिकट्टूप्रमाणे महाराष्ट्रात बैलगाडीच्या शर्यतींना परवानगी देण्यात यावी, अशी भूमिका शिवसेनेचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी घेतली होती. 


बैलगाडा शर्यतीदरम्यान बैलांना अतिशय निर्दयीपणे वागवण्यात येत असल्याने २०११ मध्ये अध्यादेश काढून प्राण्यांच्या शर्यतीवर बंदी घातली गेली होती. त्यामुळे बैलगाडा शर्यतींवरही बंदी आली.