मुंबई : शिवसेना खासदार आनंदराव अडसूळांच्या सिटी को-ऑपरेटीव्ह बँकेवर रिझर्व्हने निर्बंध घातले आहेत. त्यामुळे खातेदारांचा जीव टांगणीला लागला आहे. दरम्यान, लवकरच या बॅंकेच्या दुसऱ्या बॅंकेत विलीनकरण होण्याची सिटी को-ऑपरेटीव्ह बँकेच्या व्यवस्थापनाला आशा आहे. सिटी को-ऑपरेटीव्ह बँकेवर रिझर्व्ह बॅंकेचे निर्बंध लादल्याने आता खातेदारांना १ हजार रुपयांपेक्षा जास्त रक्कम काढता येणार नाही. १७ एप्रिलपासून इतर बँकिंग व्यवहार करण्यास मनाई करण्यात आली आहे. त्यामुळे  शिवसेनेचे खासदार आनंदराव अडसूळ यांना हा मोठा दणका मानला जात आहेत. अडसूळ सिटी को-ऑपरेटीव्ह बँकेवर चेअरमन आहेत.


ग्राहकांची एकच धावपळ


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'द सिटी कॉ. ऑप' यांना अचानक रिझर्व्ह बँकेच्यावतीने देण्यात आलेल्या आदेशानुसार ग्राहकाची धावपळ सुरू झाली आहे. द सिटी कॉ-ऑपरेटीव्ह बँकेबाहेर पडलेला ग्राहकांचा गराडा आणि आक्रोश सध्या दिसून येत आहे. द सिटी कॉ.बँकेला अचानक आरबीआयच्या सूचना आल्या आणि सर्व व्यवहार ठप्प झाले. त्यामुळे बँकेतले आपले पैसे बुडाल्याच्या भीतीने बँक ग्राहकांच्या पायाखालची जमीन सरकली आणि त्यांनी बँकेत धाव घेतली.



 पुढे काय होणार याचीच चिंता


कुणाचे पाच लाख, कुणाचे १० दहा लाख तर कुणाची आष्युभराची कमाई यात अडकलीय. आता बँक ग्राहकांना सहा महिन्यात केवळ हजार रुपयेच काढता येणार आहे. या कालावधीत इनवर्ड आउटवर्ड क्लिअरिंग बंद राहील. तसेच इसीएस, आरटीजीएस आणि एनईएफटीने रक्कम दुसऱ्या बँकेत वळवता येणार नाही. पेन्शनचे पैसे अडकल्याने ज्येष्ठ नागरिक हवालदिल झालेत. तर लग्नसराईत बँकेचं विघ्न आल्याने आता जावं तरी कुणाकडे? असा प्रश्न काहींना पडलाय.  याविषयी बँक मॅनेजरकडे विचारणा केली असता त्यांनी आरबीआयच्या निर्देशानुसार बँकेचे व्यवहार बंद केल्याचं सांगितले आहे. त्यामुळे पुढे काय होणार याचीच चिंता जास्त आहे.