राकेश त्रिवेदी, झी मीडिया, मुंबई : दाऊद इब्राहीमच्या गँगने आता महिला उद्योजकांना धमकवायला सुरूवात केलीय. त्यासाठी गँगमध्ये खास लेडीज विंगच सुरू केल्याची धक्कादायक माहिती पुढे येतेय.


दाऊदने तोडला जुना नियम


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अंडरवर्ल्डचं जग कितीही खतरनाक असलं तरी इथे काही नियम पूर्वापार पाळले जायचे असं सांगतात. त्यातला महत्त्वाचा नियम म्हणजे शत्रूच्या कुटुंबियांना हात लावायचा नाही, महिला आणि मुलांना धमकवायचं नाही... अगदी छोटा राजन दाऊद इब्राहीम शत्रुत्व ऐन भरात असतानाही राजनच्या चेंबूरमध्ये राहणाऱ्या कुटुंबियांना दाऊद टोळीने धोका पोहोचवला नाही, असं यातले जाणकार सांगतात. मात्र आता दाऊदने हा नियम तोडल्याचं सांगितलं जातंय.


दाऊदची लेडीज विंग?


सूत्रांच्या माहितीनुसार दाऊदची डी कंपनी आता थेट महिलांना धमकावूनही पैसे उकळतेय.  दाऊद इब्राहीमने गँगमध्ये खास लेडीज विंग तयार केलीय. महिला उद्योजकांना हेरून त्यांची संपूर्ण आर्थिक माहिती काढून ही माहिती या विंगकडून दाऊदला पुरवली जाते. छोटा शकीलच्या उस्मान नावाच्या गुंडाकडे महिला उद्योजकांना धमकवण्याची जबाबदारी सोपवण्यात आल्याचं सूत्र सांगतात. तपास यंत्रणांनी इंटरसेप्ट केलेल्या काही कॉल्सनुसार महिला टारगेट्सचा उल्लेख करण्यासाठी बेगम, क्वीनसारखे कोडवर्ड वापरले जातात.


खारमध्ये तक्रार दाखल


नुकतीच खार पोलीस ठाण्यात एका महिला उद्योजिकेने दाऊद आणि छोटा शकीलच्या काही गुंडांविरोधात तक्रार नोंदवली. या महिला उद्योजिकेकडे दाऊद गँगने एक कोटींची खंडणी मागितली होती. तसंच जीवे मारण्याची धमकीही दिली होती.  


या तक्रारीनंतर आता अंडरवर्ल्डच्या या बदललेल्या ट्रेंडचा पोलीस शोध घेत आहेत... तसंच दाऊद आणि शकील गँगच्या सर्वच कारवायांवर बारीक नजर ठेवली जातेय.